गेल्या कांही दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे गोव्याकडे जाणाऱ्या बेळगाव -चोर्ला रस्त्याची बऱ्याच ठिकाणी पुन्हा संपूर्ण वाताहत झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप होत असून वाहने नादुरुस्त होण्याचे प्रकार घडत आहेत.
गेल्या कांही दिवसात पडलेल्या दमदार पावसामुळे बेळगाव शहरातील रस्त्यांप्रमाणे अलीकडेच दुरुस्त केलेल्या बेळगाव -चोर्ला रस्त्याची देखील दुर्दशा झाली आहे.
निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे कांही ठिकाणी असंख्य खाचखळगे पडून या रस्त्याची चाळण झाली आहे. त्याचप्रमाणे कांही ठिकाणी भले मोठे खड्डे पडल्यामुळे रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण झाले आहे.
गढूळ पाण्याची मोठी डबकी बनलेल्या रस्त्यावरील या खड्ड्यांमधून अतिशय संथ गतीने आपली हाकताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या डबक्या सदृश्य खड्ड्यांचा अंदाज मिळाल्यामुळे किरकोळ अपघातांसह वाहने नादुरुस्त होण्याचे प्रकारही घडत आहेत. एकंदर या रस्त्यावरील वाहतूक धोकादायक बनली आहे.
गोव्याला जाण्यासाठी हा जवळचा महामार्ग असल्यामुळे या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. तसेच या मार्गावरून दररोज बेळगाव येथून भाजीपाला आणि उद्यमबाग परिसरातील कच्च्या मालाची गोव्याला वाहतूक होत असते. या पद्धतीने मोठ्या वर्दळीच्या असलेल्या या रस्त्याची गेल्या दोन महिन्यापूर्वीच दुरुस्ती करण्यात आली होती.
मात्र सध्या या रस्त्याची दुरावस्था झाली असून संबंधित विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे या रस्त्यावरील लहान-मोठ्या अपघातांची मालिकाही वाढत आहे.
तरी लोकप्रतिनिधींसह संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन खराब झालेल्या बेळगाव -चोर्ला रस्त्याची युद्ध पातळीवर डागडुजी करावी आणि वाहन चालकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.