बेळगावातील प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना भारतीय हवाई दलाची भूमिका, त्याची क्षमता आणि तयारी यासह अग्नीवीरवायूंच्या प्रेरणा व प्रशिक्षणाची माहिती व्हावी, यासाठी सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूलतर्फे (एटीएस) काल शुक्रवारी प्रसिद्धी माध्यम अभिमुखता कार्यक्रम राबविण्यात आला.
सदर प्रसिद्धी माध्यम अभिमुखता कार्यक्रमांतर्गत शहरातील पत्रकारांना भारतीय हवाई दलाचा (आयएएफ) थोडक्यात इतिहास, आयएएफने केलेल्या लढाया, त्यामधील योगदान, मानवी मदत आपत्कालीन मदत (एचएडीआर) यासह अलीकडच्या काळातील इतर मोहिमा याबद्दल माहिती देण्यात आली.
या सादरीकरणांमध्ये युवा रिक्रुट्सना प्रशिक्षण देऊन राष्ट्र उभारणीसाठी एटीएस बेळगाव घेत असलेल्या परिश्रमाच्या माहितीचाही अंतर्भाव होता. यावेळी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांना एअरमन ट्रेनिंग स्कूलचा दौरा घडवून लढाऊ आणि बिगर लढाऊ प्रशिक्षणार्थींना विविध स्तरावर कशा पद्धतीने सैद्धांतिक आणि व्यावहारिक अर्थात शारीरिक प्रशिक्षण दिले जाते याची माहिती दिली.
या प्रसिद्धी माध्यम अभिमुखता कार्यक्रमादरम्यान सैनिक देवाण-घेवाण उपक्रमांतर्गत श्रीलंका, केमरून आणि इतर मित्र राष्ट्रांचे सैनिक बेळगाव एअरमन ट्रेनिंग स्कूल येथे 32 आठवड्याचे प्रशिक्षण घेत असल्याची माहितीही यावेळी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
शेवटी एटीएस बेळगावचे एयर ऑफिसर कमांडिंग एअर कमोडोर एस. श्रीधर यांनी उपस्थित पत्रकारांचे आभार मानले. उपरोक्त प्रसिद्धी माध्यम अभिमुक्ता कार्यक्रमाद्वारे शहरातील पत्रकारांना सांबरा, बेळगाव येथील एअरमन ट्रेनिंग येथे भारतीय हवाई दलाच्या विविध पैलूंचे प्रत्यक्ष दर्शन घडले.