गावामध्ये पायाभूत सुविधा पुरवा, अन्यथा आमचे गाव ग्रामपंचायतीत समाविष्ट करा, अशी जोरदार मागणी बसवण कुडची ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे
बसवण कुडची गावाचा समावेश बेळगाव महापालिका कार्यक्षेत्रात आहे. परंतु, याठिकाणी पायाभूत सुविधा पुरवण्याकडे मनपाचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे प्रशासनाने गावात त्वरेने पायाभूत सुविधा पूरवाव्यात अन्यथा गावाचा समावेश ग्रामपंचायतींमध्ये करावा, अशी मागणी बसवण कुडचीच्या समस्त गावकऱ्यांनी कलमेश्वर मंदिरात मंगळवारी झालेल्या बैठकीत केली. महापालिका बसवण कुडची गावाकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप करताना गावकऱ्यांनी शेतामध्ये जाण्यासाठी संपर्क रस्ते नाहीत.
इतर भागाच्या तुलनेत आमच्या भागाचा अपेक्षेप्रमाणे विकास झालेला नाही. आमचे गाव धड शहरही नाही आणि धड गावही नाही. त्यामुळे अडचण निर्माण झाली असल्याची व्यथा बैठकीत मांडली.
याप्रसंगी बोलताना बसवराज हन्नीकेरी यांनी बसवण कुडची भागात मोठ्या प्रमाणात भाताचे पीक घेतले जाते. शेताकडे जाण्यासाठी संपर्क रस्ता नाही. तो तयार करण्याची मागणी आम्ही अनेक वर्षांपासून करत आहोत. याखेरीज आठ दिवसांतून एकदा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने समस्या निर्माण होत आहे.
अस्वच्छ नाल्यांमुळे रोगराई पसरत आहे कशी माहिती देऊन सदर समस्यांवर युद्धपातळीवर तोडगा काढावा, अशी मागणी केली. राजकुमार पाटील यांनी बसवण कुडची हा भाग 40 वर्षांपासून मनपाच्या अखत्यारीत असतानाही आजपर्यंत आयुक्त व महापौरांचे या गावाकडे दुर्लक्ष झाले आहे.
नियमितपणे मालमत्ता कर भरूनही गाव पायाभूत सुविधांपासून वंचित असल्याचे स्पष्ट केले. बैठकीस महावीर पाटील, पारीस बोगार, शांतीनाथ उप्परगी, बाळू सावकार, जिन्नाप्पा पाटील आदींसह बहुसंख्या ग्रामस्थ उपस्थित होते.