बेळगाव लाईव्ह : बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रभू यत्नट्टी यांची कायमस्वरूपी सनद रद्द करण्याच्या राज्य बार कौन्सिलच्या आदेशाला बार कौन्सिल ऑफ इंडियाने स्थगिती दिली आहे अशी माहिती वकील यत्नट्टी यांनी ‘Belgaum Live -बेळगाव लाइव्ह’शी बोलताना दिली आहे.
मागील काही दिवसापूर्वी कर्नाटक बार कौन्सिलने बेळगाव बार असोसियएशनचे तत्कालीन अध्यक्ष प्रभू यत्न यांची वकिलीची सनद कायम स्वरुपी रद्द करावी असा आदेश दिला होता.त्यानंतर यत्नट्टी यांना बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्षपद सोडावे लागले होते.
त्यानंतर त्यांनी राज्य कौन्सिलच्या आदेशावर दिल्लीत बार कौन्सिल ऑफ इंडिया कडे दाद मागितली होती त्यावर बार कौन्सिल ऑफ इंडियाने स्थगिती दिली आहे.
या स्थगितीच्या आदेशामुळे आगामी काळात यत्नट्टी हे पुन्हा बेळगाव बार असोसिएशन अध्यक्ष पदी रुजू होणार आहेत.
एका शेतकऱ्याने भूसंपादनात मिळालेली नुकसान भरपाईची रक्कम परस्पर खाल्याचा आरोप करत कर्नाटक राज्य कौन्सिल कडे तक्रार केली होती त्यानुसार यत्नट्टी यांची सनद रद्द करावी असा आदेश बजावण्यात आला होता.
सोमवारी सायंकाळी बार कौन्सिल ऑफ इंडियाने यत्नट्टी यांना दिलासा दिल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी बेळगाव कोर्ट परिसरात फटाक्याची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.