धारवाड येथील उत्तर कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे बेळगावच्या अस्मिता क्रिएशन निर्मित “दडपण” या चित्रपटाला कर्नाटकातील पहिला “सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट” हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
भाग्यनगर येथील सिटी हॉलमध्ये आज रविवारी सकाळी या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सदर समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून तर कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स अर्थात उत्तर कर्नाटक चित्रपट वाणिज्य विभागाचे अध्यक्ष डॉ. शंकरराव सुगते आणि सचिव मंजुनाथ हगेदार उपस्थित होते.
या उभयतांच्या हस्ते “दडपण” या चित्रपटाला संपूर्ण कर्नाटकातील पहिला “सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अस्मिता क्रिएशन्स बेळगावचे संस्थापक आणि ‘दडपण’ चित्रपटाचे निर्माता राजेश गणपती लोहार यांनी दिग्दर्शक संतोष सुतार यांच्या समवेत सदर पुरस्काराचा स्वीकार केला.
याप्रसंगी बोलताना डॉ शंकरराव सुगते म्हणाले की, अस्मिता क्रिएशन्स निर्मित “दडपण” हा चित्रपट विद्यार्थी आणि पालकांमध्येच नव्हे तर सर्वसामान्य जनतेमध्ये मोठी जागृती निर्माण करत आहे. या चित्रपटामुळे निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना आळा बसेल आणि जागृती निर्माण होईल असे जनतेचे मत आहे. आमच्या संघटनेकडून हा चित्रपट नोंदणीकृत आणि अधिकृत होत असल्याचा आम्हाला अभिमान आहे असे सांगून हा चित्रपट फक्त कर्नाटकातच नाही तर देशासह जगभरात गाजावा अशा शुभेच्छा दिल्या.
तसेच उत्तर कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स यापुढे अस्मिता क्रिएशन्सच्या मागे कायम उभे राहील आणि त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासनही डॉ. सुगते यांनी दिले. मंजुनाथ हगेदार यांनी देखील दडपण चित्रपटाची प्रशंसा करून अस्मिता क्रिएशन्सने भविष्यात अशाच प्रकारचे उत्तमोत्तम चित्रपट बनवावे अशा शुभेच्छा दिल्या. निर्माते राजेश लोहार व दिग्दर्शक संतोष सुतार यांनी ‘दडपण’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाच्या पुरस्काराने गौरवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी उत्तर कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे राजेश लोहार व संतोष सुतार यांच्यासह “दडपण”च्या संपूर्ण टीमला गौरविण्यात आले. समारंभास उत्तर कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स धारवाडचे अन्य पदाधिकाऱ्यांसह अस्मिता क्रिएशन्स बेळगावचे सदस्य, दडपण चित्रपटाची संपूर्ण टीम आणि निमंत्रित, हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.