बेळगाव लाईव्ह -काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक उद्या रविवार दि.27 ऑगस्ट रोजी संपन्न होत आहे.
या निवडणुकीत विद्यमान चेअरमन आणि या कारखान्याच्या उभारणीत व वाटचालीत सिंहाचा वाटा असलेले श्री अविनाश पोतदार संचलित पॅनल विरुद्ध दुसरे एक पॅनल यांच्यात लढत होत आहे. या निवडणुकीत आमच्याच पॅनलचा विजय होईल असा विश्वास यानिमित्त बोलताना अविनाश पोतदार यांनी व्यक्त केला.
अविनाश पोतदार यांच्या पॅनल मधील ‘अ ‘ सामान्य गटात अनिल पावशे, अनिल शंकर कुट्रे ,अविनाश रामभाऊ पोतदार, अशोक परशराम नाईक ,बसवंत शंकर मायाणाचे, बाबुराव सिदराय पिंगट, यल्लाप्पा रेमानाचे, यांचा समावेश असून अनुसूचित जाती गटातून चेतक कांबळे , अनुसूचित जमाती गटातून सत्याप्पा मुचंडी, इतर मागास अ वर्गातून उदय सिद्धन्नावर ,इतर मागास ब वर्गातून मनोहर हुक्केरीकर, महिला गटातून नीलिमा पावशे व सुधा म्हाळोजी, सहकारी ब वर्ग गटातून प्रदीप मारुती अष्टेकर तर ड वर्ग गटातून भरत गंगाधर शानभाग हे निवडणूक लढवीत आहेत.
या पॅनलमध्ये असलेले सर्व उमेदवार हे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून त्यांचा जनमानसात वेगळा ठसा आहे.
या निवडणुकीबाबत बोलताना अविनाश पोतदार म्हणाले की, “अथक परिश्रमातून माझ्या वडिलांनी म्हणजे स्वर्गीय रामभाऊ पोतदार यांनी पाहिलेले स्वप्न आम्ही पूर्ण केले आणि 2019- 20 यावर्षी कारखान्याचे गळीत चालू केले. केवळ तीनच वर्षे गळीत झाले असल्याने कारखाना अजून बाल्यावस्थेत आहे .त्यामुळे तिथे शक्ती प्रदर्शनाची गरज नाही. कारखाना व्यवस्थित चालण्याच्या दृष्टीने मशीनरीचे अत्याधुनिकरण करण्याची गरज आहे. त्यासाठी विविध स्थानिक सोसायटी व संस्थांकडून पैसा उभारण्यात आला आहे.
ऊसाला अधिकाधिक उतार मेळावा यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. गेल्या तीन वर्षात 2400 ते 2700 रुपये चा दर आम्ही दिला असून शेतकऱ्यांची उधारी बाकी ठेवलेली नाही. जागा लिजवर असून सुद्धा आम्हाला अनेकांनी आर्थिक मदत केली आह आम्ही केलेले कार्य लक्षात घेऊन आमचे मतदार आम्हास भरघोस मतांनी निवडून देतील. असा मला विश्वास आहे” असे अविनाश पोतदार म्हणाले .
सर्व सभासदांनी आपली बहुमोल मते आमच्या पॅनलच्या उमेदवारांना द्यावीत असे आवाहनही त्यांनी जनतेला केले आहे.