बेळगाव लाईव्ह :जागतिक कीर्तीचे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जत (महाराष्ट्र) येथे आत्महत्या केली असून त्यांच्या आत्महत्येची बातमी आज बुधवारी समजतात बेळगावातील त्यांचे असंख्य चाहते आणि हितचिंतकांना मोठा धक्का बसला आहे.
नितीन देसाई हे वारंवार बेळगावला येत होते. त्यांचे बेळगावशी जिव्हाळ्याचे नाते होते. राजा शिवछत्रपती मालिकेनंतर प्रथमच बेळगावला आल्यानंतर त्यांची बेळगावमध्ये फॅन फॉलोइंग आणि क्रेझ होती. विशेष म्हणजे व्हॅक्सीडेंट डेपोचा जो विकास सुरू आहे. त्या ठिकाणी जी एव्हिएशन गॅलरी आणि ग्रामसंस्कृतीचे दर्शन घडवणारा प्रकल्प बनवण्यात येत आहे. त्याच्या कामाचे कंत्राट नितीन देसाईंच्या कंपनीकडेच होता. त्यामुळे त्यांचे वारंवार बेळगावला येणे -जाणे होते. त्यांच्या आत्महत्येमुळे बेळगाववासियांना धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मोठी लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळविणारे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जत येथील आपल्या एन.डी. स्टुडिओमध्येच आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येचे निश्चित कारण सध्या स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्यांच्या चाहत्यांसह कलाक्षेत्रातील सर्वांनाच धक्का बसला आहे. मराठी चित्रपटापासून ते बॉलीवूडच्या गाजलेल्या चित्रपटांसाठी त्यांनी कला दिग्दर्शन केलं होतं संजय लीला भन्साळी, अशुतोष गोवारीकर आणि प्रियदर्शन सारख्या दिग्गज दिग्दर्शन सोबत त्यांनी काम केलेलं आहे. भुलभुलय्या, लगान, देवदास, जोधा अकबर, अशा चित्रपटांना त्यांनी केला दिग्दर्शन केलं होतं.
टीव्हीवरील लोकप्रिय मालिका राजा शिवछत्रपती प्रदर्शित झाल्यानंतर ते बेळगाव भेटीवर आले होते. त्यावेळी बेळगाव त्यांचे तुफान स्वागत झाले होते. त्यावेळी शहरात साजरा केल्या जाणाऱ्या शारदोत्सवाला देखील एका वर्षी प्रमुख पाहुणे या नात्याने त्यांनी हजेरी लावली होती.
राजा शिवछत्रपती मालिका प्रदर्शित झाल्यानंतर ते कांही वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बेळगावला येऊन गेले होते. बालगंधर्व चित्रपट प्रदर्शना वेळी देखील त्यांनी बेळगावला भेट दिली होती. त्यावेळी नर्तकी चित्रपटगृहात झालेल्या बालगंधर्व चित्रपटाच्या प्रीमियर शोप्रसंगी देसाई यांच्या समवेत सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे हे देखील उपस्थित होते. या खेरीज व्हॅक्सीन डेपो येथे जे नवे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.
त्यासाठीही बऱ्याचदा बेळगावला आलेल्या नितीन देसाई यांचे त्यापैकी कांही प्रकल्पांवर कामही सुरू होते. शहरातील एव्हिएशन गॅलरी, ग्राम संस्कृती दर्शन घडविणारी गॅलरी उभारण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान व मार्गदर्शन लाभत होते. बेळगावातील वेगवेगळ्या संस्था आणि व्यक्तींशी त्यांचे वैयक्तिक संबंध होते.