सालाबादप्रमाणे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर श्रीराम सेना हिंदुस्तानतर्फे काल मंगळवारी रात्री ध्वजारोहणासह फटाक्यांच्या आतषबाजीत अखंड हिंदुस्तान संकल्प दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
शहरातील टिळक चौक येथे या संकल्प दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांतदादा कोंडुसकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील नूलचे प. पू. श्री भगवानगिरी महाराज तसेच प्रमुख वक्ते म्हणून बीड येथील प्रख्यात कीर्तनकार प्रा. गणेश शिंदे आणि छ. संभाजीनगरच्या (औरंगाबाद) कट्टर हिंदुत्ववादी नेत्या हर्षु ठाकूर या उपस्थित होत्या. प्रारंभी विनायक मोरे ऑर्केस्ट्राचा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम झाला.
त्यानंतर प्रमुख वक्ते प्रा. गणेश शिंदे यांनी आपल्या भाषणात देशाचा स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्यानंतरचा काळ तसेच छ. शिवाजी महाराज आणि छ. संभाजी महाराज यांचे जीवन याबद्दल माहिती दिली. त्याचप्रमाणे हर्षु ठाकूर यांनी ‘लव्ह जिहाद’ वर आपले परखड मत मांडताना हिंदू मुली -युवतींनी आपला धर्म, आपली संस्कृती कशी सांभाळावी या संदर्भात मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.
अखंड हिंदुस्तान संकल्प दिन सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे याप्रसंगी गेल्या जानेवारी 2023 मध्ये भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमान अपघातात शहीद झालेले वैमानिक विंग कमांडर हनुमंत सारथी यांच्या आई-वडिलांचा यथोचित सत्कार करून एका वीर पुत्राला जन्म दिल्याबद्दल त्यांना नमन करण्यात आले. गेल्या जानेवारी महिन्या अखेर ग्वाल्हेर विमानतळानजीक मोरेना (मध्यप्रदेश) येथे भारतीय हवाई दलाच्या सुखोई एमके -1 आणि मिराज -2000 या लढाऊ विमानांचा अपघात झाला होता त्यामध्ये वैमानिक विंग कमांडर सारथी शहीद झाले होते.
माजी सैनिक संघटनेच्या अध्यक्षांनी यावेळी देश सेवा कशी करावी याबाबत मार्गदर्शन केल्यानंतर यावेळी नूल भगवानगिरी महाराजांचे आशीर्वादपर भाषण झाले. अखेर रात्री ठीक 12 वाजल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रध्वज तिरंगा फडकावून अखंड हिंदुस्तान संकल्प दिन साजरा करण्यात आला.
यावेळी करण्यात आलेल्या फटाक्याच्या आतिषबाजीमुळे आकाश उजळून निघाले होते. शेवटी श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी सर्वांचे आभार मानले. सदर सोहळ्यास श्रीराम सेना हिंदुस्थानचे सर्व पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.