बेळगाव लाईव्ह : जवळपास तीन आठवड्यावर असलेला बेळगावातील सर्वात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा गणेश उत्सवाची तयारी आतापासूनच सुरु झाली असून अनेक मंडळांनी आपापल्या उपक्रमांना सुरुवात केली आहे.
सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ महात्मा फुले चौक खडक गल्ली, भडकल गल्ली यांच्यातर्फे आयोजित श्री गणेश मंडपाचा मुहूर्तमेढ रोहण आणि टी-शर्ट अनावरण सोहळा काल शुक्रवारी सायंकाळी माजी आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.
सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ महात्मा फुले चौक, खडक गल्ली, भडकलगल्ली बेळगाव यांच्यावतीने काल शुक्रवारी सायंकाळी बेळगाव महानगर भाजप अध्यक्ष बेळगाव उत्तरचे माजी आमदार ॲड. अनिल बेनके साहेबांच्या हस्ते बेळगावकरांचा मानाचा गणपती “खडक गल्लीचा राजा” याच्या मंडपाचा मुहूर्तमेढ व मंडळाच्या टी-शर्ट्सच्या अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी गल्लीचे पंचमंडळ व सल्लागार मंडळाकडून मंडळाचे अध्यक्ष विकास चौगुले व उपाध्यक्ष सुनील कनेरी यांच्याकडे 51 हजार रुपयांची देणगी सुपूर्द केली गेली.
यंदा इन्फिनिटी प्रोडक्शन बेळगावचे अनुप पवार हे खडगल्लीच्या राजा वरील गाणे सादर करणार आहेत. यासाठी मंडळाच्यावतीने त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी आपल्या समयोचित भाषणात माजी आमदार ॲड. अनिल बेनके यांनी मंडळाच्या अमृत महोत्सवासाठी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच मंडळास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सदर सोहळ्यास गल्लीतील पंचमंडळ, सल्लागार मंडळ, युवक मंडळ व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोहळा यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सार्व. श्री गणेशोत्सव मंडळ महात्मा फुले चौक खडक गल्ली, भडकल गल्ली यांच्यातर्फे यावर्षी श्री गणेश आगमनापासून विसर्जन सोहळ्यापर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामध्ये मोफत नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर, भजन- कीर्तन व भावगीत, भक्तिगीत कार्यक्रम, गल्लीतील जेष्ठ नागरिक व मूर्तिकार यांचा सत्कार, श्री सहस्त्र आवर्तन, सामूहिक अथर्वशीर्ष पठण आदींचा समावेश असणार आहे.याचा सर्व गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.
एकूणच बेळगाव शहरात गणेश उत्सवाचे जल्लोषी स्वागत होणार असून अनेक मंडळे आगमन सोहळा साजरा करण्याच्या तयारीत गुंतली आहेत तर काही मंडळे ढोल ताशा तयारी तर काही विद्युत रोषणाई हालते देखावे तयार करण्यात तर काही सामाजिक उपक्रम आणि स्पर्धांची तयारी करण्यात देखील गुंतली आहेत.एकूणच बेळगाव शहरात आतापासूनच गणपतीचे फिव्हर दिसू लागले आहे.