बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस सरकारने मतदारांना पाच हमी योजनांची आश्वासने दिली. पाच हमी योजनांपैकी तीन योजना याआधीच जारी करण्यात आल्या असून आता गृहलक्ष्मी योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा दोन हजार रुपये देण्याचा निर्णय काँग्रेस सरकारने घेतला आहे. या योजनेसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून महिलावर्ग विविध ऑनलाइन केंद्रांवर गर्दी करताना दिसून येत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र सर्वर डाऊन असल्याने अनेक महिलांना अर्ज भरण्यासाठी अडचणी येत आहेत. मात्र तरीही सकाळपासूनच महिलावर्ग ऑनलाईन केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.
१९ तारखेपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र सुरुवातीलाच सर्व्हर डाऊनचा फटका बसल्याने महिलावर्गाला माघारी परतावे लागले होती. या योजनेच्या अर्ज प्रक्रियेसाठी महिलावर्ग आपला विशेष वेळ राखीव ठेवत असून सोमवारी बेळगावमधील विविध ऑनलाईन केंद्रावर महिलांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.
शनिवार आणि रविवार असे दोन्ही दिवस पावसाने जोरदार हजेरी लावल्याने आज शहर परिसरातील शाळांना जिल्हा प्रशासनाने सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळे आज सकाळपासूनच महिलावर्गाने आपल्या मुलांसमवेत अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन केंद्रावर मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. चिमुकल्या बाळांना घेऊन देखील महिलांनी अर्ज भरण्यासाठी आज हजेरी लावल्याचे पहायला मिळाले. जुन्या महानगरपालिकेच्या इमारतीत सकाळपासूनच महिलांनी ‘गृहलक्ष्मी’साठी अर्ज सादर करण्यासाठी गर्दी केली होती. जुन्या महानगरपालिकेच्या इमारतीसमोर महिलांच्या लांबच लांब रांगाही पाहायला मिळाल्या.
शनिवार आणि रविवर्प्रमाणेच सोमवारी सकाळीही पावसाची रिपरिप सुरूच होती. मात्र, अशा पावसात देखील महिलावर्ग रांगेत ताटकळत उभा राहिलेला पाहायला मिळाला. बेळगाव वन, कर्नाटक वन, बापूजी सेवा केंद्र, ग्रामवन सेवा केंद्र अशा विविध ऑनलाईन सेंटरमध्ये सकाळपासून महिलांची तुडुंब गर्दी होताना पाहायला मिळत आहे.
17 ऑगस्ट रोजी या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या बँक खात्यावर पहिल्या टप्प्यातील दोन हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी महिलांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरावे असे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. यानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिलावर्ग अर्ज भरण्यासाठी गर्दी करताना पाहायला मिळत आहे.