बेळगाव लाईव्ह : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करणाऱ्या भारत देशात आजही मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना झगडावे लागते हे भारतीय स्वातंत्र्याचे दुर्दैव म्हणावे लागेल.
जगावर अधिराज्य करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या भारतात आजही रस्ते, गटारी, पथदीप, आरोग्यसुविधा यासारख्या मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना आंदोलने करावी लागतात, मागण्या कराव्या लागतात पण तरीही याकडे डोळेझाक केली जाते याहून मोठी दुर्दशा असू शकत नाही.
बेळगाव शहराची स्मार्ट सिटी करण्याच्या नादात लोकप्रतिनिधींनी तेच तेच तेच रस्ते पुन्हा पुन्हा करून आधीच शहराची अवस्था बिकट केली आहे आणि दुसरीकडे तालुक्याच्या ठिकाणी नागरिकांना एकदाही रस्त्याचे सुख अनुभवता येत नाही, अशी परिस्थिती सध्या बेळगावमधील नागरिक अनुभवत आहेत.
- तालुक्याच्या खानापूर भागात सध्या अशीच कशीही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. निसर्गाच्या सानिध्यात वनराईने व्यापलेला खानापूर तालुका शहरवासीयांना केवळ वर्ष पर्यटनासाठी आकर्षित करतो. परंतु याच भागातील असुविधा कधीच कुणाच्या लक्षात आजपर्यंत आल्या नाहीत. खानापूर तालुका म्हणजे अतिजंगलाने व्यापलेला तालुका, त्यातच या तालुक्यात पावसाचे प्रमाण नेहमीच जास्त असते. मुसळधार पावसामुळे या तालुक्याच्या जंगल भागाच्या खेड्यातील लोकांचे जीवनमान खुप कष्टाचे बनते. देशभरात विविध राज्य एकमेकांना जोडण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून राष्ट्रीय महामार्गाचा अट्टहास केला जातो. मात्र खानापूर सारख्या ठिकाणचे रस्ते बनवून जनतेला सोयीसुविधा पुरविण्याकडेमात्र कुणाचेच लक्ष जात नाही, हि येथील लोकांची शोकांतिका आहे.
खानापूर तालुक्यातील पास्टोली, गवाळी या गावच्या लोकांचीही अशीच अवस्था आहे. या भागात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे येथील नदी-नाल्यांना पूर येतो. मात्र या नद्या, नाले पार करण्यासाठी अद्यापही या लोकांना पर्यायी व्यवस्थाच करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील लोक नेहमीच पावसाळा आला कि लाकडाचे साकव, आडी तयार करतात. तालुक्याच्या ठिकाणी यायचंच झालं तर या लोकांना आडी, साकव यासारख्या गोष्टींचा वापर करून नद्या नाले पार करण्याची कसरत करावी लागते. अद्यापही येथील नागरिकांना रस्त्याची व्यवस्था करून देण्यात आली नाही.
या भागात कधी बस सेवा पुरविली नाही. पावसाळा आला कि या भागातील नागरिकांचा इतर ठिकाणचा संपर्क तुटतो. आजारी असलेल्या रुग्णांना जिवंतपणीच खांद्यावरून आणायची वेळ येथील लोकांवर येते. इतकेच नव्हे तर गर्भवती महिलांना देखील या कसरतीतून मुक्तता मिळाली नाही. कित्येकवेळा गर्भवती महिलांना चौघांच्या खांद्यावरून नदी, नाले पार करून, आपल्यासह होणाऱ्या बाळाचा जीव मुठीत घेऊन तालुक्यातील डॉक्टरांकडे आणले जाते. येथील लोकांची हि दैना पाहता भारताच्या स्वातंत्र्याचा आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा विरोधाभास जाणवतो.
या भागातील लोकप्रतिनिधींनीही आजतागायत येथील नागरिकांच्या समस्येकडे लक्ष पुरविले नाही. यामुळे आजही या भागातील जनता वनवासात राहिल्याप्रमाणे आपले जीवन जगत आहे. येथील जनतेच्या नशिबी आलेला हा वनवास लोकप्रतिनिधी, स्थानिक प्रशासन आणि जिल्हा प्रशासन लवकर सोडवून खऱ्या अर्थाने भारत जागतिक महासत्ता बनण्यासाठी प्रयत्न करतील का? असा सवाल येथील नागरिक उपस्थित करत आहेत.