बेळगाव लाईव्ह : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत राबविण्यात आलेल्या विकासकामांचे वाभाडे निघत असून याचा फटका मात्र नागरिकांना सोसावा लागत आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या नियोजन शून्य आणि अर्धवट अवस्थेतील विकासकामावरून नागरिक संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या वडगाव रोड, अन्नपूर्णेश्वरीनगर पाचवा क्रॉस येथील विकासकामांची देखील अशीच दैना उडालेली पहायला मिळत असून येथील गटारीच्या अर्धवट बांधकामामुळे गटारीतुन पावसाचे पाणी ओव्हरफ्लो होऊन आसपासची घरे, विहिरी आणि शेतांमध्ये शिरत असून प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
सध्याच्या मुसळधार पावसामुळे बेळगावमध्ये झालेल्या अर्धवट स्थितीतील आणि निकृष्ट दर्जाच्या विकासकामांचे खरे स्वरूप दिसू लागले आहे. वडगाव रोड, अन्नपूर्णेश्वरीनगर पाचवा क्रॉस येथील गटारांचे बांधकाम अलीकडेच हाती घेण्यात आले होते. मात्र ते व्यवस्थित पूर्ण करण्यात आलेले नाही. त्याचप्रमाणे रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आल्यामुळे एका बाजूला मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून पाणी साचून राहिले आहे. या खड्ड्यांमध्ये वाहने अडकून पडण्याची भीती आहे. त्याचप्रमाणे अर्धवट गटार बांधकामामुळे पावसाचे पाणी निचरा होऊन न जाता वडगाव रोडवरून वाहत असून ते पाचवा क्रॉस येथील घराघरात शिरू लागले आहे. गटारीतील केरकचरा घाणमिश्रित पाणी घरात शिरत असल्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले असून त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कालपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने वडगावच्या दिशेने वाहून येणारे पाणी वडगाव रोड, अन्नपूर्णेश्वरीनगर येथे काही ठिकाणी रस्त्यावरून दुसऱ्या बाजूला वाहत आहे. याव्यतिरिक्त हे पाणी वडगाव रोडवर असलेल्या शेत जमिनीमध्ये देखील शिरत आहे. परिणामी ते पाणी रोखून त्याचा निचरा करण्यासाठी शेतकऱ्यांना धडपडावे लागत आहे.
त्याचप्रमाणे गटारी मधील सांडपाण्यामुळे अन्नपूर्णेश्वरीनगर पाचवा क्रॉस येथील विहिरी दूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या सर्व समस्या पावसाच्या पाण्याला बळ्ळारी नाल्याकडे जाण्यास वाट मोकळी करून देण्यात न दिल्यामुळे निर्माण झाल्याचे बोलले जात असून प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरीकातून होत आहे.