सवत्स गोमाता ही भारतीय संस्कृतीची ओळख आहे .ऐश्वर्य, संपन्नता ,संस्कृती याची ग्राम जीवनातील ओळख म्हणजे गोवंश.
ग्रामीण जीवनात गायीला अनन्य साधारण महत्व आहे .कृषीपूरक गोष्टीसाठी गोवंशाची मदत होते, म्हणून शेतकरी नेहमीच विशेषता गायींचे पालन पोषण करत आला आहे.
बेळगावची संस्कृती अर्धनागरी आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग बेळगाव शहरात देखील पसरला आहे. अनेक गल्ल्यातून आजही पशुपालन केले जाते. या पार्श्वभूमीवर विष्णू गल्ली वडगांव येथील शेतकरी हणमंत बाळेकुंद्री यांनी आपल्या पाहिलटकरिन गायीचे यथासांग डोहाळ जेवण घातले.
काही दिवसापूर्वी या गायीचा पाय मोडून गाय जखमी झाली होती त्यावेळी बाळेकुंद्री कुटुंबीयांनी आपल्या घरच्या सदस्या प्रमाणे तिची सेवा करून तिला बरे करून घेतले .त्याच गायीचे पहिले वेत आता होणार आहे. या आनंदात त्यांनी डोहाळ जेवणाचा घाट घातला.
ज्ञानेश्वर मंदिर वडगाव येथे झालेल्या या मुक्या जनावराच्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात आपल्या घरच्या मुलीच्या कार्यक्रमाप्रमाणे सगळी व्यवस्था केली होती . गल्लीतील नागरिक पै पाहुणे, लेकीबाळी, शेतकरी वर्ग यांना आमंत्रण देण्यात आले होते. मिठाई, फळे, खाद्य पदार्थ यांची आरास करत खणा नारळाने ओटी भरून घरच्या लेकिसारखे डोहाळे जेवण घालण्यात आले.नवनिर्मितीचा, नव्या जिवाचा पाहुल चाहुलीचा हा क्षण आपल्यात हर्ष निर्माण करतो अशीच भावना बाळेकुंद्री कुटुंबीयांची झाली. पशुधनावर शेतकरी नितांत प्रेम करतात आणि त्यांना आपल्या घरचाच सदस्य मानतात याचे असे प्रसंग प्रतीक असतात. दिवाळी, बैल पोळा अश्या माध्यमातून शेतकरी आपल्या जवळ असलेल्या पशू धनाचे कोडकौतुक करत असतो.
भारतीय संस्कृतीची ओळख अधोरेखित करणाऱ्या या प्रसंगाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
'शेतकऱ्याची माई.. गायीत लेक पाही'|BELGAUM LIVE – Belgaum Live – बेळगाव लाईव्ह |
वडगावातील बाळेकुंद्री या शेतकरी कुटुंबाने गायीचे केलं डोहाळे जेवण – बेळगावातील शेतकरी आपल्या पशू धनावर घरच्या लेकी प्रमाणे किती प्रेम करतो त्याचे दर्शन देणारा व्हीडिओ#Farmersanimallove#cowlove pic.twitter.com/ftZ8Jnpq6c
— Belgaumlive (@belgaumlive) July 17, 2023