कांही लोकांकडून समाजातील मुस्लिम समुदायाच्या विरोधात जाणीवपूर्वक षडयंत्र रचून असंतोषाचे वातावरण निर्माण केले जात आहे. त्यातूनच पिरनवाडी येथील अरबाज मुल्ला याचा खून झाला असल्याचा आरोप करत अरबाजच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी पिरनवाडी मुस्लिम समाजाच्याने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
सदर निवेदन सादर करण्यापूर्वी पिरनवाडीच्या मुस्लिम बांधवांनी आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. तसेच मारेकऱ्यांना कठोर शासन करून मयत अरबाज मुल्ला याला न्याय द्यावा. त्या मारेकऱ्यांना जन्मठेपेची वगैरे शिक्षण न देता थेट फाशीवर चढवावे अशी मागणी केली. निदर्शने करणाऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी पिरनवाडी मुस्लिम बांधवांच्या निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. खानापूर येथे अरबाज नावाच्या युवकाचा खून झाल्यानंतर जाणीवपूर्वक मुस्लिम समुदायातील युवकाचा खून करण्याची ही दुसरी घटना आहे. अरबाज मुल्ला याचा जबरदस्तीने अपहरण खून करण्यात आला आणि त्यानंतर त्याला अज्ञात स्थळी नेऊन टाकण्याचा प्रकार शांततापूर्ण बेळगावसाठी धोक्याचा इशारा देणार आहे. कांही समाजकंटक आणि विघ्नसंतोषी मंडळी जाणीवपूर्वक एका विशिष्ट समुदायाच्या विरोधात षडयंत्र रचत असल्यामुळे त्याचे पर्यवसान खुलेआम खून करण्यामध्ये होत आहे.
संबंधित लोक बेधडकपणे कायदा पायदळी तुडवून एखाद्याचा खून करण्यासारखे प्रकार करत असल्यामुळे त्यांच्या मागे एखाद्या गुप्त शक्तीचा हात असण्याची शक्यता आहे. गुन्हेगारांना प्रोत्साहन व पाठिंबा देणाऱ्या अशा लोकांचा बंदोबस्त होणे अत्यंत गरजेचे आहे. तेंव्हा अरबाज मुल्ला यांच्या खून प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन त्याच्या मारेकऱ्यांना कठोर शासन केले जावे आणि बेळगाव शहराची शांतता आणि सुरक्षा अबाधित राखावी, ही नम्र विनंती अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
यावेळी प्रसिद्धी माध्यमांची बोलताना मयत अरबाज मुल्लाच्या आजीने आपल्या नातवाला दोघा अज्ञातांनी कशाप्रकारे जबरदस्तीने घरातून नेले आणि त्याचा खून केला याची माहिती दिली. तसेच आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली. त्याचप्रमाणे उपस्थित महिलांनी मारेकऱ्यांना तुरुंगवास जन्मठेप वगैरे शिक्षा न देता थेट फाशीची शिक्षा द्यावी. ज्यामुळे गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण होऊन भविष्यात अरबाज प्रमाणे नाहक हत्या होणार नाहीत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. पिरनवाडी येथील प्रमोद पाटील यांनी मयत अरबाज मुल्ला हा सरळ स्वभावाचा निष्पाप युवक होता असे सांगून त्याच्या कार्यकर्त्यांना कठोर शासन झाले पाहिजे असे मत व्यक्त केले. तसेच सरकारने मयताच्या गरीब कुटुंबाकडे स्वतःचे घर नसल्यामुळे घरकुल योजनेअंतर्गत त्यांना एक घर बांधून द्यावे. याखेरीज अरबाजच्या आजीला पेन्शन वगैरे कांही नसल्यामुळे दरमहा तिला चरितार्थासाठी आर्थिक मदत केली जावी अशी मागणी केली. अन्य एकाने सोशल मीडियावर जी प्रक्षोभक व्यक्तव्य केली जात आहेत त्याचे हे दुष्परिणाम आहेत.
तेंव्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सोशल मीडियावर चुकीची प्रक्षोभक वक्तव्य करणारा जो कोणी असेल, मग तो कोणत्याही जाती-धर्माचा असेना त्याच्यावर कठोर कारवाई करावी असे सांगितले. याप्रसंगी पिरनवाडीच्या मुस्लिम समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात एकच गर्दी केली होती.