महिला प्रवाशांच्या गर्दीमुळे विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा मिळणे कठीण झाले आहे. त्यासाठी अगसगे आणि परिसरातील विद्यार्थ्यांकरिता सायंकाळच्या सत्रात विशेष बस सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी अखिल कर्नाटक रयत संघाच्या बेळगाव तालुका शाखेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
अखिल कर्नाटक रयत संघाच्या बेळगाव तालुका शाखेचे अध्यक्ष बसवराज पाटील आणि शेतकरी नेते कलगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. बेळगाव तालुक्यातील अगसगे आणि आसपासच्या गावातील बहुसंख्य विद्यार्थी -विद्यार्थिनी बेळगाव शहरातील शाळा -कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. यासाठी हे विद्यार्थी दररोज बसने ये -जा करतात.
त्यांच्यासाठी सकाळच्या वेळी गावातून बसची सोय आहे. मात्र सायंकाळी येण्यासाठी बसची चांगली सोय नाही. त्यामुळे शाळा कॉलेजच्या विद्यार्थी -विद्यार्थिनींना घरी परतण्यास रात्रीचे 8, 8:30 वाजत आहेत. परिणामी पालक वर्गाला चिंता लागून राहण्याबरोबरच मुलांच्या अभ्यासावरही परिणाम होत आहे.
यासाठी दररोज सायंकाळी 5 वाजता आणि त्यानंतर 6 वाजता खास विद्यार्थ्यांसाठी विशेष बससेवा उपलब्ध करून देण्यात यावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
या संदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना शेतकरी नेते कलगौडा रायगौडा पाटील म्हणाले की, सरकारच्या महिलांसाठीच्या मोफत बस प्रवास योजनेमुळे सध्या प्रत्येक बस गाडीत महिलांचीच गर्दी होत आहे. त्यामुळे शिक्षणासाठी आमच्या गावची मुले सकाळी बसने व्यवस्थित बेळगावला जातात. मात्र सायंकाळी शाळा -कॉलेज सुटल्यानंतर प्रत्येक बस महिलांनी भरलेली असल्यामुळे विद्यार्थ्यांना जागा मिळत नाही.
त्यामुळे त्यांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. परिणामी त्यांना घरी परतण्यास चक्क रात्र होत आहे. त्यासाठी आमचे अगसगे गाव आणि परिसरातील गावातील विद्यार्थ्यांकरिता विशेष बस सेवा सुरू करावी अशी आमची मागणी आहे. याप्रसंगी अखिल कर्नाटक रयत संघाचे तालुका सचिव प्रकाश लोहार, दुंड्डेप्पा होसपेट, लक्ष्मण लुमाजी आदी उपस्थित होते.
राज्य परिवहन मंडळाने या समस्येकडे लक्ष द्यावे pic.twitter.com/OVrOb7XC6p
— Belgaumlive (@belgaumlive) July 17, 2023