महापालिकेच्या चारही स्थायी समिती अध्यक्षांच्या नूतन कक्षांचे मंगळवारी (दि. 18) उद्घाटन झाले. महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम झाला.
महापालिकेच्या बाजुला उभारण्यात आलेल्या नव्या इमारतीत स्थायी समिती अध्यक्षांचे कक्ष उभारण्यात आले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ही इमारत वापराविनाच होती.
अखेर स्थायी समिती अध्यक्ष, पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि आमदार राजू सेट यांचे कक्ष या इमारतीत उभारण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींचे कक्ष एकाच इमारतीत असणार आहेत.
मंगळवारी सकाळी 11 वाजता स्थायी समिती अध्यक्षांच्या कक्षांचे उद्घाटन होते. पण, आयुक्त दुडगुंटी, महापौर शोभा सोमनाचे आणि उपमहापौर रेश्मा पाटील या उशीरा आल्यामुळे साडेबारा वाजता कक्षाचे उद्घाटन झाले.
आरोग्य स्थायी समिती, सार्वजनिक बांधकाम स्थायी समिती, नगर योजना आणि विकास स्थायी समिती आणि लेखा स्थायी समितीच्या अध्यक्षांच्या कक्षाचे उद्घाटन महापौर शोभा सोमनाचे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रत्येक कक्षात पूजन करण्यात आले.
रवी धोत्रे, वाणी जोशी, वीणा विजापुरे आणि सविता पाटील या स्थायी समिती अध्यक्षांसह सर्व स्थायी समिती सदस्य, नगरसेवक, आरोग्याधिकारी डॉ. संजय डूमगोळ, पर्यावरण अभियंते हणमंत कलादगी, अधिक्षक अभियंता लक्ष्मी निपाणीकर, प्रशासन विभागाच्या उपायुक्त भाग्यश्री हुग्गी, महसूल विभागाचे उपायुक्त प्रशांत हणगंडी यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.