बेळगाव महापालिकेत महापौर उपमहापौर पदी महिला विराजमान झाल्या नंतर चार पैकी तीन स्थायी समित्या वर देखील महिला नगरसेविका अध्यक्ष पदी विराजमान झाल्या आहेत त्यामुळे पुन्हा एकदा बेळगाव मनपा वर महिलाराज असे म्हणायला काहीच हरकत नाही.
शुक्रवारी सकाळी बेळगाव मनपात महापालिका स्थायी समिती अध्यक्ष निवड प्रक्रिया बिनविरोध झाली. सदर प्रक्रिये अंती अर्थ स्थायी समिती अध्यक्षपदी विणा विजापुरे, आरोग्य स्थायी समिती अध्यक्षपदी रवी धोत्रे, बांधकाम स्थायी समिती अध्यक्षपदी विणा जोशी तर लेखा स्थायी समिती अध्यक्षपदी सविता पाटील यांची निवड झाली आहे.
बेळगाव महापालिका स्थायी समिती यांच्या अध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया आज शुक्रवारी सकाळी 11 वाजता महापौर शोभा सोमनाचे आणि उपमहापौर रेश्मा पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली.
आजी माजी आमदार मनपा आयुक्त दुडगुंटी हे देखील उपस्थित होते. मनपा स्थायी समित्यांच्या अध्यक्षपदासाठीची नावे आधीच निश्चित झाली असल्यामुळे आजची निवड प्रक्रिया औपचारिकता म्हणून पार पाडण्यात आली.
अध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आल्यानंतर निवडून आलेल्या अर्थ स्थायी समिती अध्यक्ष विणा विजापुरे, आरोग्य स्थायी समिती अध्यक्ष रवी धोत्रे, बांधकाम स्थायी समिती अध्यक्ष विणा जोशी आणि लेखा स्थायी समिती अध्यक्ष सविता पाटील यांचे महापौर सोमनाचे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदांची निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना माजी आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आजवरच्या बेळगाव महापालिकेच्या परंपरेनुसार यावेळी देखील स्थायी समित्यांच्या अध्यक्षांची निवड अविरोध झाल्याचे स्पष्ट करून निवडून आलेल्या अध्यक्षांची नावे जाहीर केली. सदर निवड प्रक्रिया बिन विरोध व्हावी हा आमचा प्रयत्न यशस्वी झाला असून सर्व 58 नगरसेवकांच्या सहकार्यामुळे हे घडले आहे.
याच पद्धतीने आता यापुढे सर्वांच्या साथीने बेळगाव शहर स्वच्छ सुंदर व्हावे यासाठी आमचा प्रयत्न असेल असे सांगून यासाठी सर्व 58 नगरसेवक आम्हाला सहकार्य करतील, असा विश्वास माजी आमदार बेनके यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना स्थायी समित्यांच्या नूतन अध्यक्षांनी देखील शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.