गेल्या चार-पाच दिवसापासून बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील बेळगुंदी वगैरे परिसरात पाऊस पडत असल्यामुळे या ठिकाणच्या रताळी लागवडीला वेग आला आहे. यंदा पावसाने उशिर केल्यामुळे लागवडीलाही उशिराने सुरुवात झाली आहे.
बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागात रताळी लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. लागवड केल्यानंतर चार महिन्यांनी एपीएमसीला हा माल पाठवला जातो. येथील माल दर्जेदार असल्यामुळे दिल्ली, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आदी भागातून रताळी मालाला मागणी असते.
गतवर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीत रताळ्यांना चांगला दर मिळाला होता. त्यामुळे यंदा रताळी लागवडीमध्ये वाढ झाली आहे. गेल्या चार-पाच दिवसापासून रिमझिम पाऊस पडू लागल्यामुळे शेतामध्ये शेतकरी रताळी वेलांची लागवड करताना पहावयास मिळत आहेत.
अद्यापही कांही ठिकाणी रोजगार हमी योजनेची कामे सुरू असल्यामुळे रताळी लागवडीच्या कामासाठी शेतमजुरांचा तुटवडा भासत आहे. पश्चिम भागातील बेळगुंदी, बेनकनहळ्ळी, बिजगर्णी, कावळेवाडी, बडस, बाकनुर, किणये, उचगाव, कुद्रेमानी तसेच महाराष्ट्रातील तुडये, हाजगोळी आदी भागात मोठ्या प्रमाणात रताळी पिक घेतले जाते. बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागात मात्र फक्त हातावर मोजण्याइतकेच लोक रताळी लागवड करतात.
रताळी पिकाला पावसाची गरज असते यंदा पावसाला उशिरा सुरुवात झाली आहे. सध्या पश्चिम भागात रिमझिम पाऊस पडत असला तरी शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
यंदाही रताळ्यांना चांगला दर मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी रताळी लागवड सुरू केली असून पाऊस आपल्याला साथ देईल अशी त्यांना आशा आहे. सद्यस्थितीत रताळी वेलांच्या लागवडीला गती आली असून अजून दहा-पंधरा दिवस रताळी लागवड केली जाणार आहे.