बेळगाव लाईव्ह : समाजाच्या दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम छत्रपती शाहू महाराजांनी केले. छत्रपती शाहू महाराज राजा म्हणून जितके श्रेष्ठ होते तितकेच ते माणूस म्हणूनही श्रेष्ठ होते असे प्रतिपादन ऍड. संभाजी मोहिते यांनी केले.
छत्रपती राजर्षी शाहू स्मृती जन्मशताब्दी निमित्त छत्रपती शाहू प्रकाशन मंडळाचे साप्ताहिक राष्ट्रवीर, मराठा समाज सुधारणा मंडळ, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ श्री तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भाऊराव काकतकर महाविद्यालयाच्या सभागृहात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कराड येथील व्याख्याते ऍड. संभाजीराव मोहिते यांनी शाहू विचारांचा जागर करत शाहू महाराजांच्या विचारांचे महत्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे उपाध्यक्ष ऍड. राजाभाऊ पाटील हे होते. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांना उजाळा देताना ऍड. संभाजी मोहिते यांनी राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक समतेसाठी अनेक मार्ग चोखाळताना केलेल्या समाजोन्नतीपर कार्याचा आढावा घेत अनेक उदाहरणे दिली आणि अनेक प्रसंग सांगत प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
सुमारे दीड तास चाललेल्या या व्याख्यानात प्रेक्षकांना शाहू विचारांचा अनमोल खजिना गवसल्याचा आनंद झाला. या व्याख्यानात राजर्षी शाहू महाराज माणूस आणि राजा यात असणारे फरक त्यांनी समजावून सांगितले. शाहू महाराज हे माणसातील राजा होते अशा पद्धतीचे एक आगळे वेगळे शाहू महाराजांचे दर्शनही त्यांनी रसिकांना घडविले. राजर्षी शाहू महाराजांच्या शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक कार्याबद्दल माहिती करून देत शाहूंच्या विचारांचा जागर करण्यात आला. छत्रपती शाहू महाराज ऍड. संभाजी मोहिते यांनी शताब्दी वर्षानिमित्त आजवर ११५ व्याख्याने दिली आहेत. आज बेळगावमध्ये आयोजिण्यात आलेले त्यांचे हे ११६ वे व्याख्यान होते.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्राध्यापक, विद्यार्थी आणि विविध मान्यवर उपस्थित होते. आनंद मेणसे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य विक्रम पाटील यांनी सूत्रसंचलन तर गुणवंत पाटील यांनी आभार मानले.