प्रचंड मागणी आणि दबावामुळे गेल्या जून 2022 मध्ये बेळगाव रेल्वे स्थानक ते बेळगाव सांबरा विमानतळापर्यंतची शटल बस सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र दुर्दैवाने आता अवघ्या वर्षभरात ही बस सेवा वायव्य कर्नाटक राज्य परिवहन मंडळाने (एनडब्ल्यूकेआरटीसी) बंद केली आहे.
रेल आणि एअर ब्रॅण्डिंगने सुशोभित केलेली ही बस सध्या मध्यवर्ती बस स्थानक (सीबीटी) ते रामतीर्थनगर या मार्गावर धावताना दिसत आहे.
बसेसच्या तुटवड्यामुळे रेल टू एअर सर्व्हिस बस रद्द करून ती पुन्हा शहरी बस सेवेत सामावून घेण्यात आल्याचे एनडब्ल्यूकेआरटीसीने स्पष्ट केले आहे. तसेच नजीकच्या काळात जर अतिरिक्त बस गाड्या उपलब्ध झाल्यास रेल टू एअर सर्व्हिस अर्थात बेळगाव रेल्वे स्थानक ते बेळगाव विमानतळापर्यंतची बस सेवा विनंतीवरून पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही नमूद केले आहे.
दरम्यान बेळगाव रेल्वे स्थानक ते विमानतळापर्यंतच्या बस सेवेला समाधानकारक प्रतिसाद मिळून हवाई प्रवास करणाऱ्या शहरातील नागरिकांची चांगली सोय होत असताना अचानक कोणतीही जाहीर पूर्व सूचना सदर बस सेवा रद्द करण्याच्या कृतीचा तीव्र निषेध केला जात आहे.