बेळगाव लाईव्ह : राज्य सरकारने लागू केलेल्या “शक्ती” योजनेअंतर्गत उत्तर-पश्चिम कर्नाटक मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून 4 जुलैपर्यंत एकूण ३.१५ कोटी महिलांनी मोफत प्रवास केला आहे. या योजनेंतर्गत महिलांनी प्रवास केलेल्या तिकिटांचे मूल्य रु. ८०.९६ कोटी रुपये इतके झाले आहे.
कर्नाटक सरकारने महिला सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या ‘शक्ती’ योजनेला कर्नाटकातील महिलांसाठी सरकारी बसमधून मोफत प्रवास करण्याच्या योजनेला अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. ही योजना लागू होऊन २४ दिवस उलटून गेले तरी महिलांचा उत्साह कमी झालेला नाही.
४ जुलै रोजी उत्तर-पश्चिम कर्नाटक मार्ग परिवहन महामंडळाच्या अंतर्गत धारवाड, बेळगाव, बागलकोट, गदग, हावेरी आणि उत्तर कन्नड या सहा जिल्ह्यांतील ९ परिवहन विभागांच्या बसमधून १५६३८८१ महिलांनी मोफत प्रवास केला असून प्रवासाच्या तिकीटाची किंमत रु. ३८९०९१८७ इतकी आहे.
११ जून रोजी योजना लागू झाल्यापासून ते ४ जुलै या कालावधीत एकूण ३१५०८६५४ महिलांनी मोफत प्रवास केला असून या एकूण प्रवासाच्या तिकीटाची किंमत रु. ८०९६५१८७६ इतकी झाली आहे.
यासंदर्भात वायव्य कर्नाटक परिवहनचे व्यवस्थापकीय संचालक भरत एस. यांनी, हा प्रकल्प लोकसहभाग आणि कर्मचार्यांच्या कामगिरीमुळे यशस्वीरित्या प्रगतीपथावर जात असल्याचे सांगितले.
अल्पावधीतच या योजनेची सुरळीत अंमलबजावणी सुरु असून उपलब्ध असलेल्या मुबलक बसेस आणि मनुष्यबळाचा उत्तम वापर करून हि योजना यशस्वीपणे सुरू ठेवण्यासाठी कर्मचारी व अधिकाऱ्यांचीहि मेहनत वाखाणण्याजोगी असल्याचे ते म्हणाले.