बेळगाव लाईव्ह : शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून रिंग रोड आणि बायपास चा घाट कर्नाटक सरकारने घातला आहे. या प्रकल्पाला एकीकडे शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होत असताना आज बेळगावमध्ये बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री सतीश जारकीहोळी यांनी रिंग रोड आणि बायपास अटळ असल्याचे संकेत दिले आहेत.
बेळगावचा रिंग रोड आणि हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल, कामाला दिरंगाई झाल्याने ठेकेदार काम सोडून गेला आहे. याबाबत आम्ही राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना सांगितले असून, त्याच कंत्राटदाराला काम देण्यास मी सांगितले आहे. आता केंद्र सरकारने निर्णय घ्यायचा आहे असे ते म्हणाले. राज्यातील २८ राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्गांमध्ये सुधारित करण्यात येणार आहेत. याबाबत केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलणे झाल्याचे मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले.
बेळगावमध्ये बुडा, स्मार्ट सिटी यासह विविध विभागात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत असून बुडामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात खाजगीत लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. बुडामधील भ्रष्टाचार आणि खाऊकट्टा संदर्भात होत असलेल्या अनियमिततेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, यासाठी बेंगळुरूहून अधिकारी चौकशीसाठी येणार आहेत. सचिव दर्जाचे अधिकारी याची चौकशी करतील असे मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले.
बेळगाव जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेसंदर्भात तसेच खानापूर – गोवा राष्ट्रोय महामार्गावर टोलवसुलीसंदर्भातही त्यांनी प्रतिक्रिया दिली. पावसाने यंदा दडी मारली असून पाऊस न पडणाऱ्या जिल्ह्यांना दुष्काळी जिल्हा म्हणून जाहीर करण्यात येणार असून सरकार लवकरच दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची घोषणा करणार आहे. १५ जुलैपर्यंत पावसाचे प्रमाण पाहून हा निर्णय घेण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात बोलताना त्यांनी येत्या दोन महिन्यात काँग्रेस उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले. चिकोडी आणि बेळगावमध्ये इच्छुकांची यादी मोठी असून स्थानिक आमदार आणि नेत्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात येईल. आवश्यक असेल तरच जारकीहोळी कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवेल, असे ते म्हणाले.