बेळगाव महापालिका आणि स्मार्ट सिटी लिमिटेडच्या दुर्लक्षामुळे अशोकनगर येथील प्रमुख रस्त्यासह सर्व्हिस रोड्सची पार दुरवस्था झाली असून त्याकडे तात्काळ लक्ष देण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
पावसाळी मौसम सुरू झाल्यामुळे शहरातील अर्धवट अवस्थेतील विकास कामे आणि दुरुस्ती अभावी खराब झालेल्या रस्त्याच्या ठिकाणी सध्या पाण्याची तळी आणि चिखलाची दलदल निर्माण झाली आहे. अशोकनगर येथील रस्तेही त्याला अपवाद नाहीत.
महापालिका आणि स्मार्ट सिटी लिमिटेडच्या दुर्लक्षामुळे येथील मुख्य दुपदरी रस्त्यावर ड्रेनेजचे मोठे पाईप गेल्या अनेक दिवसांपासून धूळ खात पडून आहेत. त्यामुळे एका बाजूचा रस्ता अरुंद झाला आहे. यात भर म्हणून पाण्याच्या निचऱ्याची सोय नसल्यामुळे कांही ठिकाणी जवळपास अर्धा रस्ता सांडपाण्याच्या तळ्यांनी व्यापल्याचे दिसून येत आहे. या रस्त्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी फूटपाथ जवळ ठराविक अंतरावर झाडे लावण्यासाठी कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत.
मात्र अद्यापपर्यंत त्यामध्ये झाडे -फुले झाडे लावण्यात आलेली नाहीत. रस्त्यावरील सांडपाण्याची तळी, बेवारस पडलेले ड्रेनेजचे पाईप आणि फुलझाडे नसलेल्या कुंड्या यामुळे या प्रशस्त मार्गाला भकास स्वरूप प्राप्त झाले आहे.
हीच अवस्था या ठिकाणच्या सर्व्हिस रोड्सची झाली आहे. या रस्त्यांकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष झाले आहे. परिणामी हे रस्ते खराब असून रस्त्याशेजारी चिखल व सांडपाण्याची तळी निर्माण झाली आहेत.
यात भर म्हणून अलीकडे ठीक ठिकाणी केलेल्या खोदकामामुळे या रस्त्यांची अधिकच दुर्दशा झाली आहे. तेंव्हा लोकप्रतिनिधींसह महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ आवश्यक कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.