कोणत्याही गावचे नांव त्या गावच्या भूमिपुत्राने एखाद्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्यास मोठे होत असते. खानापूर साठीही असाच एक अभिमानाचा क्षण आला आहे. कारण संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद असणारी इस्रोची चांद्रयान -3 मोहीम आज शुक्रवारी दुपारी पार पडत असून या मोहिमेत खानापूरच्या प्रकाश पेडणेकर या युवा वैज्ञानिकाचे योगदान आहे हे विशेष होय.
देशाच्या इतिहासात आजचा शुक्रवार 14 जुलै हा दिवस सुवर्ण अक्षराने लिहिला जाणार आहे. कारण भारताचे चांद्रयान -3 आज दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी श्रीहरीकोटा येथून चंद्राच्या दिशेने झेपावेल.
हा क्षण जसा भारतीय वैज्ञानिकांसह देशवासीयांसाठी अभिमानास्पद आहे, तसा असतो खानापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाराही आहे. कारण या चांद्रयानाच्या यशस्वी उड्डाणामध्ये तालुक्यातील अनगडी येथील प्रकाश पेडणेकर या युवा वैज्ञानिकांचा हातभारही लागला आहे.
अनगडी गावचे सुपुत्र प्रकाश पेडणेकर यांना यापूर्वी चांद्रयान -2 च्या मोहिमेमध्येही सहभागी होण्याचा सन्मान मिळाला होता. त्यावेळी संधीचं सोनं करीत त्यांनी पुन्हा यावेळीही चांद्रयान -3 च्या मोहिमेतील आपला सहभाग निश्चित केला होता. चंद्रयान -2 ची मोहीम कांही तांत्रिक बिघाडामुळे अपयशी ठरली होती. तथापि यावेळची मोहीम फत्ते करायचीच या जिद्दीने इस्रोचे वैज्ञानिक झपाटून कामाला लागले होते. त्यात प्रकाश यांचाही सहभाग होता.
रॉकेट लॉन्चिंगसाठीच्या कार्यात त्यांनी योगदान दिले आहे. चांद्रयान -3 आज दुपारी आकाशात चंद्राच्या दिशेने जेव्हा झेपावेल त्यावेळी प्रत्येक भारतीयाला जसा आपल्या वैज्ञानिकांचा अभिमान वाटेल तसा तो खानापूरच्या जनतेला देखील वाटणार आहे.
दरम्यान युवा वैज्ञानिक प्रकाश पेडणेकर यांनी इस्रोची या वेळची ही मोहीम निश्चितपणे यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.