गृहलक्ष्मी योजनेसाठी ग्राम -वन सेवा केंद्र चालकांना प्रत्येक अर्जामागे सरकार सध्या देत असलेला मोबदला परवडणारा नाही. तेंव्हा त्या ऐवजी केंद्र चालकांना निश्चित मानधन पगार देण्यात यावा, अशी मागणी बेळगाव जिल्ह्यातील ग्राम -वन सेवा केंद्र चालकांनी सरकारकडे केली असून मागणी मान्य न झाल्यास सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.
गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत प्रत्येक अर्जामागे आपल्याला देण्यात येणाऱ्या मोबदल्यात वाढ करण्यात यावी या आपल्या गेल्या आठवड्यात केलेल्या मागणीची दखल घेण्यात न आल्यामुळे जिल्ह्यातील ग्राम -वन सेवा केंद्र चालकांनी मोठ्या संख्येने येऊन आज सोमवारी सकाळी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मोठ्या संख्येने जमलेल्या या ग्राम -वन केंद्र चालकांनी जोरदार निदर्शने करून साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी प्रसिद्धी माध्यमांची बोलताना अभिषेक हा ग्राम -वन सेवा केंद्र चालक म्हणाला की, गृहलक्ष्मी या सरकारच्या योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी आम्ही दररोज सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत राबत आहोत.
आमच्या कामाचा मोबदला म्हणून सरकारने प्रत्येक अर्जामागे 12 रुपये मंजूर केले आहेत. तथापि टीडीएस, जागेचे भाडे, वीज बिल मेंटेनन्स वगैरे खर्च भागवून आमच्या हातात फक्त 6 रुपये पडतात. चरितार्थ चालवण्याच्या दृष्टीने इतका अल्प मोबदला आम्हाला परवडत नाही यासाठी प्रत्येक अर्जामागे पैसे न देता आम्हाला निश्चित मानधन पगार देण्यात यावा अन्यथा या ग्रामवण सेवेतून आम्हाला मुक्त व्हावे लागेल.
संबंधित खात्याकडून आमच्या अडचणी समस्यांची देखील दखल घेतली जात नाही फक्त आश्वासने दिली जातात. ग्रामवन सेवा केंद्रासाठी जवळपास 3 लाख रुपये खर्च करून आम्ही किट वगैरे सगळं ब्रॅण्डिंग केलं आहे. त्यामुळे सध्या सरकार आम्हाला देत असलेल्या मोबदल्यात या 3 लाखाचे व्याजही निघत नाही. आम्हाला निश्चित मानधन दिल्यास आम्ही सर्व कांही मोफत करण्यास तयार आहोत.
बिडी (ता. खानापूर) येथील ग्राम -वन सेवा केंद्राचा चालक विठ्ठल गावडा याने देखील सध्या ‘गृहलक्ष्मी’साठी सरकार देत असलेला अल्प मोबदला परवडणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच हा मोबदला पुरेशा प्रमाणात वाढवून मिळावा यासाठी मागील आठवड्यात अर्ज करून देखील सरकार प्रशासनाने कोणतीच कार्यवाही केली नसल्यामुळे आम्हाला पुन्हा आमच्या मागण्या मांडावे लागत आहेत. सरकारकडून अद्यापही ग्राम -वन चालकांना प्रत्येक अर्जामागे किती मोबदला द्यायचा हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. याबाबत विचारणा केली असता एकदा 20 रु., एकदा 12 रु. एकदा 8 रुपये असे सांगितले जाते.
सध्याच्या डिजिटल युगानुसार आम्हाला आमच्या कामाचा मोबदला मिळत नसेल तर आम्ही ग्राम -वन केंद्र कसे चालवणार? असा सवाल करून आम्हाला अनेक समस्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. चरितार्थ कसा चालवायचा? हा प्रश्न पडला आहे. यामुळे सर्वच ग्राम -वन चालक निराशेच्या गर्तेत सापडले आहेत. यासाठी आम्ही सामूहिक राजीनामा देण्याद्वारे निराशा व चिंतेतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे, असे गावडा याने स्पष्ट केले.