बेळगाव लाईव्ह : महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्तांची डिजिटल नोंद केली जात असून सदर नोंद करण्यासाठी बेळगाव महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
कर्नाटक महानगरपालिका डेटा सोसायटी (रजि) आणि महानगरपालिकेच्या प्रशासन संचालनालय, बेंगळुरू यांच्या आदेशानुसार बेळगाव महानगरपालिकेच्या वतीने मालमत्तांची डिजिटल नोंद केली जात आहे.
यासाठी महापालिका हद्दीतील सर्व नागरिकांनी आपल्या मालमत्तेचे फोटो, मालमत्तेच्या मालकांचे फोटो, मालमत्ता मालकाचे ओळखपत्र, मालमत्तेचे मालकी सिद्ध करणारी कागदपत्रे, विज बिल, पाणी बिल, नवनीतम मालमत्ता कर भरलेली पावती, बांधकाम परवानगी पत्र अशी कागदपत्रे सादर करावयाची आहेत.
यासाठी महानगरपालिकेच्या वतीने शहर उपनगरात जनजागृती केली जात आहे. शहर दक्षिण मतदार संघात आज (सोमवारी) महसूल अधिकारी श्रीमती उमा बेटेगिरी यांच्यासह यल्लेश बच्चलपुरी, परशुराम मैत्री, अमित तळवार, श्रीकांत येरले,संजय पाटील व अन्य कर्मचारी अधिकारी यांनी नागरिकांमध्ये माहीत पत्रके वाटून जनजागृती केली.
मनपातर्फे पत्रकारांना आरोग्य विमा कार्ड वितरण
बेळगाव महानगरपालिकेतर्फे पत्रकारांना आरोग्य विमा सुविधा कार्ड वाटप करण्याचा कार्यक्रम आज सोमवारी सकाळी महापौर शोभा सोमनाचे यांच्या हस्ते पार पडला.
महापालिका सभागृहामध्ये आयोजित सदर कार्यक्रमाप्रसंगी एकूण 88 पत्रकारांना त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या हितासाठी आरोग्य विमा कार्ड वितरित करण्यात आले. यावेळी बोलताना आरोग्य विमा कंपनीचे प्रतिनिधी श्रीकांत गुनारी यांनी पत्रकारांसाठी असलेली ही आरोग्य विमा योजना राज्यातील उत्कृष्ट विमा योजनांपैकी एक असल्याचे सांगितले. तसेच बेळगाव जिल्हा केंद्राच्या ठिकाणी असलेल्या 88 पत्रकारांसह त्यांचे 270 कुटुंबीय अशा एकूण 358 जणांना आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट केले.
पत्रकारांसाठी असलेल्या आरोग्य विमा योजनेअंतर्गत पत्रकारासह त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना वैद्यकीय उपचार वगैरेंसाठी वार्षिक 3 लाख रुपयांची विमा सुविधा उपलब्ध असणार आहे. हॉस्पिटलमध्ये केलेल्या उपचाराच्या बिलाची पावतीसह संबंधित पत्रकार या विमा योजनेचा लाभ घेऊ शकतात. राज्यातील एकूण 1020 हॉस्पिटल्स आणि बेळगाव जिल्ह्यातील 38 हॉस्पिटल्सच्या ठिकाणी ही विमा योजना उपलब्ध असेल असे स्पष्ट करून पत्रकार बंधूंनी या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य विमा कंपनीचे प्रतिनिधी श्रीकांत गुनारी यांनी केले. याप्रसंगी महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडकोळ, पालिका आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांच्यासह पालिकेचे अन्य अधिकारी आणि लाभार्थी पत्रकार उपस्थित होते.