कामावरून काढल्यामुळे पुजाराचा हटयोगकेवळ दोन महिन्यांत कामावरून काढून टाकल्याने संतप्त झालेल्या पुजाऱ्याने चक्क नदीत उतरून आंदोलन सुरू केले.
प्रवाहित नदीत उडी मारल्यामुळे पोलीस, अग्निशमन आणि ग्रामपंचायत प्रशासनाची त्रेधातिरपीट उडाली असून खानापूर तालुक्यातील हब्बनहट्टी येथील जागृत देवस्थान मारुती मंदिराचा पुजारी जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.
खानापूर तालु्क्यातील जांबोटी जवळील हब्बनहट्टी मारुती मंदिर प्रशासनाने मंदिरात पूजेसाठी हरियाणा येथील पुजारी देवेंद्रसिंग शर्मा यांची नियुक्ती केली होती. त्यामुळे पुजाऱ्याने आपल्या कुटंबियांसमवेत हब्बनहट्टीत येऊन काम सुरू केले होते. पण काही दिवसांतच पुजाऱ्याबाबत लोकांच्या तक्रारी येऊ लागल्या. त्यामुळे मंदिर व्यवस्थापनाने पुजारी देवेंद्र सिंग शर्मा याला कामावरून कमी केले. या प्रकारामुळे संतापलेल्या पुजारी सिंग याने मलप्रभा नदी काठावरील झाडाला झोपाळा बांधून त्याठिकाणी आंदोलन सुरू केले.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन जागे झाले. पोलिस, अग्निशमन दल आणि ग्रामपंचायत पिडिओ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पुजाऱ्याची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण आपल्याला कामावरून टाकल्यामुळे माझा संसार उघड्यावर पडला आहे.
मला माझ्या कुटुंबाच्या भविष्याची काळजी आहे. जोपर्यंत माझ्यावर अन्याय दूर होत नाही, तोपर्यंत मी आंदोलन करणार असे सांगून त्यांनी प्रवाहित मलप्रभेत उडी मारली. तत्काळ अग्निशामक दलाच्या जवानांनी त्याला ताब्यात घेतले.गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या या आंदोलनाची चर्चा मात्र संपूर्ण जिल्ह्यात सुरू झाली आहे.