बेळगाव लाईव्ह : धर्मवीर संभाजी चौकात वरिष्ठ अधिकाऱ्यांना विश्वासात न घेता एका दिवसात पोलीस चौकी उभारण्यात आली असून यासंदर्भात आज खडेबाजार पोलीस स्थानकाच्या एसीपींची भेट घेण्यात आली.
खडेबाजार पोलीस स्थानकाचे एसीपी अरुणकुमार कोळळूर यांना मराठा समाजाचे नेते किरण जाधव व धमर्वीर संभाजी महाराज चौक सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी शुक्रवारी कॅम्प येथील एसीपी कार्यालयात धर्मवीर संभाजी चौकातील अनधिकृत पोलीस चौकीच्या कामाबद्दल माहिती विचारली.
यादरम्यान पोलीस चौकी उभारण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना दिली नसल्याचे स्पष्ट दिसून आले. धर्मवीर संभाजी चौकाचे काम अद्याप पूर्ण झाले नसून याठिकाणी पोलीस चौकी उभारण्यासाठी कॅम्प येथील पोलीस स्थानकाची तसेच कॅंटोन्मेंट बोर्डाची परवानगी घेणे आवश्यक होते, असे किरण जाधव यांनी सांगितले.एएसआय पाटील यांनी अशापद्धतीची परवानगी घेतली नसल्याचे यादरम्यान पुढे आले.
धर्मवीर संभाजी चौकातील संभाजी महाराजांच्या मूर्तीचे दररोज नित्यनेमाने पूजन करण्यात येत असते. यासाठी बेळगावमधील विविध संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सामील होत असतात. यामुळे या कार्यकर्त्यांकडून हि चौकी हटविण्याची मागणी करण्यात येत असून सदर चौकी बस स्थानकाशेजारी स्थलांतरित करण्यात यावी अशी सूचना एसीपी अरुणकुमार यांना करण्यात आली.
नागरिकांच्या सोयीसाठी पोलीस आहेत या नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन पोलिसांनी आपले धोरण ठरवावे असे समाजातून मत व्यक्त होत आहे