हुंचेनहट्टी येथे काल शुक्रवारी सकाळी उघडकीस आलेली अरबाज रफिक मुल्ला या युवकाच्या खुनाची घटना पूर्व वैमनस्यातून घडल्याचे स्पष्ट झाले असून मित्रांनीच अरबाजला पार्टीसाठी नेऊन त्याचा खात्मा केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयीतांना ताब्यात घेतले आहे.
प्रसाद नागेश वडर (रा. जन्नतनगर, पिरनवाडी) आणि प्रशांत रमेश कर्लेकर (रा. सिद्धेश्वर गल्ली, पिरनवाडी) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयीतांची संशयीतांची नावे आहेत.
हैदर अली चौक पिरनवाडी येथील अरबाज रफिक मुल्ला (वय 25) या युवकाचा मृतदेह खून केलेल्या अवस्थेत काल शुक्रवारी सकाळी हुंचेनहट्टी येथील एका खाजगी महाविद्यालयाच्या मैदाना शेजारील खुल्या जागेत आढळून आला होता. या खुनाच्या घटनेबद्दल तर्कवितर्क केले जात होते.
मात्र मिळालेल्या माहितीनुसार 4 वर्षांपूर्वी अरबाज मुल्ला याने गुटखा खाऊन प्रसाद वडर यांच्या घरावर पिचकारी मारल्याने त्यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली होती. त्यानंतर अलीकडे 15 दिवसांपूर्वी अरबाज आणि प्रसाद दारू ढोसण्यासाठी पुन्हा एकत्र आले होते. तेंव्हा पुन्हा दोघांमध्ये वादावादी होऊन अरबाजने प्रसादला संपविण्याची धमकी दिली होती.
हा राग मनात धरून प्रसादने आपला मित्र प्रशांत याला सोबत घेऊन गुरुवारी रात्री अरबाजचे घर गाठले. तसेच पार्टी करण्याच्या बहाण्याने त्यांनी अरबाजला घरापासून दूर हुंचेनहट्टी येथील एका खाजगी कॉलेजच्या बाजूला असलेल्या खुल्या जागेत नेले. त्या ठिकाणी हातातील कड्याने अरबाजवर हल्ला चढविण्यात आला.
डोक्यावर प्रहार झाल्याने अरबाज खाली कोसळताच पुन्हा त्याच्यावर कड्याचे प्रहार करण्यात आले. या हल्ल्यात वर्मी फटका बसल्यामुळे अरबाजचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.