Saturday, January 25, 2025

/

स्मार्ट सिटीचे पितळ पुन्हा उघड!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : पावसाचा जोर जसा वाढत आहे त्याचप्रमाणे स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या निकृष्ट दर्जाचे पितळ उघडे पडण्याची मालिका देखील वाढत चालली आहे. मुसळधार पावसामुळे वडगाव ते अनगोळ हा अवघ्या दोन-तीन महिन्यापूर्वी विकास केलेला मुख्य रस्ता खचल्याची आणि त्यामुळे घडलेल्या अपघातात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. यामुळे स्मार्ट सिटीच्या निकृष्ट व बेजबाबदार विकासकामांचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे.

वडगाव ते अनगोळच्या रस्त्याची झालेली दुर्दशा पाहण्यासाठी आज श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी घटनास्थळी भेट देत संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून धारेवर धरले. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यासाठी अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिल्यानंतर रस्ता दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले.

गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शनिवारी उसंत घेतल्यानंतर रविवारी दिवसभर पुन्हा हजेरी लावली. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अलीकडेच स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या विकासकामांचे खरे स्वरूप जनतेसमोर आले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या विकासकामांच्या दर्जाबद्दल आधीपासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. मात्र या विकासकामांचा दर्जा आता नागरिकांसमोर उघड झाला असून याचा प्रत्यय वडगाव ते अंगोला येथील मुख्य रस्त्यावरून आला आहे. रविवारी झालेल्या जोरदार पावसात हा रस्ता खचला असून धोकादायकरीत्या खचलेल्या या रस्त्याचा मुसळधार पावसात अंदाज न आल्यामुळे रात्री 9 च्या सुमारास दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. जखमी दुचाकीस्वाराला तातडीने शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याचे नांव आकाश पाटील (रा. खादरवाडी) असल्याचे समजते.Vadgaon angol road

 belgaum

यासंदर्भातील माहिती अशी की, गेल्या 6 वर्षापासून वडगाव ते अनगोळ मुख्य रस्त्याच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र अलीकडे विधानसभा निवडणुक तोंडावर असताना मतदारांना खुश करण्यासाठी हा रस्ता घिसाडघाईने करण्यात आला. त्याचप्रमाणे या रस्त्याच्या ठिकाणी जी ड्रेनेज लाईन घालण्यात आली आहे, ती नियमानुसार वैज्ञानिक दृष्ट्या योग्य पद्धतीने न घालता सुमारे 18 फूट खोलवर घालण्यात आली आहे. भविष्यात आपल्या मालकीच्या लेआउटसाठी सोय व्हावी यासाठी एका लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून हा उपदव्याप करण्यात आल्याचे समजते. ही ड्रेनेज लाईन घातल्यानंतर खडीमातीचा चांगला भराव टाकून योग्य पद्धतीने रोड रोलर फिरवून रस्ता दर्जेदार बनवण्याकडे मात्र साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. तोंडावर असलेल्या विधानसभा निवडणूकीमुळे घिसाडघाईने रस्त्याचे विकास काम करण्यात असून आता अवघ्या 3 महिन्यातच हा रस्ता खचू लागला आहे. या पद्धतीने बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या भ्रष्ट व निकृष्ट विकास कामांचे पितळ उघडे पडल्याने नागरिकात संताप व्यक्त होत आहे.Smart city

दरम्यान, खचलेल्या रस्त्याची आणि दुचाकीस्वाराला झालेल्या अपघाताची माहिती मिळताच श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी आज सकाळी वडगाव ते अनगोळ रस्त्याला भेट देऊन पाहणी केली. तसेच संबंधित अधिकारी आणि कंत्राटदाराला घटनास्थळी बोलावून घेऊन त्यांना युद्धपातळीवर रस्त्याची दुरुस्ती करण्यास सांगितले. त्याचप्रमाणे कोंडुसकर यांनी रस्त्याचे काम केलेल्या कंत्राटदाराला अपघातग्रस्त आकाश पाटील या युवकाच्या उपचारासाठी येणारा संपूर्ण खर्च देण्यास सांगितले असून त्याने ते मान्य केले आहे. कोंडुसकर यांच्या सूचनेनंतर लागलीच जेसीबी मागवून खचलेल्या ठिकाणचा रस्ता उखडून तो व्यवस्थित दुरुस्त करण्याचे काम आज सकाळी हाती घेण्यात आले आहे. याप्रसंगी स्थानिक नागरिकांसह श्रीराम सेना हिंदुस्थानचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

एकीकडे मुख्य रस्ता खचल्यामुळे समस्या निर्माण झाली असताना दुसरीकडे या रस्त्याच्या ठिकाणी खोलवर घालण्यात आलेल्या ड्रेनेज लाईनला आसपासच्या ड्रेनेज लाईन जोडलेल्या नसल्यामुळे परिसरात सर्वत्र सांडपाणी तुंबण्याची समस्या निर्माण झाली आहे. कालच्या मुसळधार पावसामुळे तर या ड्रेनेजमधील पाणी घरात शिरले आहे. याकडेही रमाकांत कोंडुसकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधल्यामुळे आता संबंधित परिसरातील ड्रेनेजच्या साफसफाईचे काम देखील हाती घेण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कोंडुसकर यांच्या या कार्य तत्परतेबद्दल नागरिकात प्रशंसोद्गार काढले जात आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.