पावसाळ्याला सुरुवात झाली की खानापूर तालुक्याच्या पश्चिम घाटात विलोभनीय धबधब्यांसह निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागते. पावसाळ्यात येथील निसर्ग विलोभनीय असला तरी येथील प्रेक्षणीय स्थळांवर जागोजागी क्षणात होत्याचे नव्हते करणारे धोके आहेत. ज्यांची सुतरामही कल्पना नसल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. यासाठी खबरदारी म्हणून कणकुंबी वन खात्याने जंगलातील धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास निर्बंध घातले आहेत.
खानापूरच्या पश्चिम घाटातील जंगलात पावला पावलावर फेसाळत खळखळत वाहणारे शुभ्र जलस्त्रोत, ओसंडून वाहणारे धबधबे आणि हिरव्यागार डोंगरावर पसरलेली दाट धुक्याची चादर भुरळ पाडणारी असते. पावसाळ्यातील एक चित्र विलोभनीय वाटत असले तरी अतिधाडस, पाण्याशी केलेली मस्ती आणि स्टंटबाजी युक्त सेल्फीचा मोह अनेकांच्या जीवावर बेतत आहे. कणकुंबी गावाच्या आसपास असलेल्या माण, हुळंद, पारवाड, चिखले व चिगुळे येथील धबधब्यांचे मनमोहक सौंदर्य अनुभवण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक घाट माथ्यावर येतात. मात्र येथील धोक्यांची सुतराम कल्पना नसणारे तरुण अलगद अपघातांची शिकार होत आहेत. धबधब्यांची ठिकाणे आणि तेथील धोक्यांची अजिबात जाणीव नसताना पाण्यात उतरणे यापूर्वी अनेकांसाठी जीव घेणे ठरले आहे.
सध्या माणच्या शिंबोळी धबधब्याची पर्यटकांना मोठी भुरळ पडली आहे. अलीकडेच हा धबधबा नावारूपास आल्याने शनिवार, रविवारी हजारो पर्यटक येथे हजेरी लावत आहेत. विशेष म्हणजे माण ग्रामस्थ देखील या धबधब्याच्या ठिकाणी जाणे कटाक्षाने टाळतात. घाटाचा हा परिसर घनदाट जंगलाने व्यापला आहे. वाघ, अस्वल यासारख्या वन्य प्राण्यांचे हे जंगल आश्रयस्थान आहे. धबधब्याच्या परिसरात तर अनेक गुहा आहेत. तेथे हमखास अस्वले दिसून येतात. तथापि या संकटांचे तरुणांना काहींच पडलेले दिसत नाही. हेच धाडस अंगलट येण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत.
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे पश्चिम घाटात अचानक धुवाधार पाऊस येतो घाटाच्या उतारावर धबधबे वसले आहेत. त्यामुळे घाटमाथ्यावर जोरदार अतिवृष्टी होऊन कांही समजण्याच्या आत धबधब्याच्या प्रवाहात दुप्पटीने वाढ होते. अशावेळी सुरक्षित वाटणारा डोह अचानक धोक्याची पातळी ओलांडतो. त्यामुळे या अचानक उद्भवणाऱ्या धोक्याची सुतराम कल्पना नसणारे पर्यटक अलगद अंगावर संकट ओढवून घेत आहेत. यासाठीच कणकुंबी वनविभागाने धोकादायक धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास निर्बंध घातले आहेत.
तसेच आरक्षित जंगलामध्ये अतिक्रमित प्रवेश कर्नाटक वन अधिनियम 1663 कलम 24 अंतर्गत दंडणीय आहे. (एक वर्ष कारावास आणि दंडाची शिक्षा) सूचना : फॉल्स /धबधबा प्रवेश करण्यास मनाई आहे, अशा मजकुराचे फलकही वनखात्याने संबंधित धबधब्यांकडे जाणाऱ्या मार्गावर उभारले आहेत.