रविवार दुपार नंतरचा दिवसात महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष पुन्हा एकदा चर्चेला आला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांनी नऊ मंत्र्यांसह शिवसेना-भाजप युतीतील सरकारमध्ये प्रवेश करत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली या महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या उलटापालटीची चर्चा बेळगाव सह सीमा भागात देखील रंगली आहे.
अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत, कोण स्टेटस ठेवून देतायेत, कोण रील करत आहेत. तर कुणी चर्चासत्र करून रविवारची संध्याकाळ रंगतदार करत आहेत. या महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची चर्चा सर्व बेळगावात दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बेळगावात अस्तित्व कमी प्रमाणात असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसला आणि शरद पवारांना मानणारा वर्ग बेळगाव सीमा भागात मोठ्या प्रमाणात आहे. बेळगावच्या जवळच असलेल्या चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी अजितदादांचा हात पकडला असल्याचे प्राथमिक दर्शनी चित्र आहे. तर बेळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काय करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.
बेळगाव शहरातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते अमित देसाई राष्ट्रवादीच्या इंजिनिअर सेलचे राज्य अध्यक्ष आहेत, ते कुणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष होतं .,मात्र अमित देसाई यांनी फेसबुक वर पोस्ट करून आपण बुजुर्ग पवारांसोबत राहणार असे स्पष्ट केले.
शरद पवार यांचा सीमा लढ्यात नेहमीच सहभाग राहिल्यामुळे सीमाभागात राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबीय यांच्याबाबत औस्तुक्याचे वातावरण असतं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांच्या भूमिकेकडे सीमाभागाचे नेहमीच लक्ष असतं. बरेचसे लोक शरद पवारांच्या निर्णयांची सीमा भागात वाट बघत असतात. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत घडलेल्या घटनेचे पडसाद सीमाभागात निश्चितच उमटले गेले, अनेक घराघरात चर्चा चालू झाली. राजकीय वातावरण तयार होत गेलं आणि अशा या परिस्थितीत बेळगावातील राष्ट्रवादी पक्षाचे जे पदाधिकारी आहेत ते कुठे आहेत कोणत्या दिशेकडे त्यांची वाटचाल आहे याच्या विषयी कुतुहल निर्माण झाल्यामुळे अनेकजण त्यांच्याकडे आणि बेळगाव लाईव्हकडे फोन करून विचारणा करत होते .
या सर्व घटनेचा मागोवा घेताना आम्ही अमित देसाई यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी मोठे पवार साहेब यांच्याबरोबरच राहू असे कार्यकर्त्यांचे मनोगत व्यक्त केले. आणि बेळगावकर बहुतांशीपणाने बुजुर्ग पवारांच्या पाठीमागे राहणार अशी भावना निश्चित वाटत आहे.
बेळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत ते मोठ्या पवारांकडे जाणार का लहान पवारांकडे याबाबत अजून कोणतीच भूमिका स्पष्ट केली नाही. मात्र बेळगावच्या शेजारी असलेल्या मतदारसंघाचे चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी मात्र अजितदादांची साथ पकडलेली आहे. सीमाभागात राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेत प्रवेश केल्यामुळे ज्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचाल निर्माण झाली, त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात भाजपमधील काही नेत्यांना अडचणीची स्थिती निर्माण झाल्यामुळे त्यांची अवघडलेली स्थिती झाली आहे.
सत्तेची गणिते बदलत जाणार आहेत . हसन मुश्रीफ इन झाल्यामुळे तिथे असणारे समरर्जीत घाडगे आणि महाडिक यांनाही वेगळ्या परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे. त्याचप्रमाणे राजेश पाटील अजित दादांच्या सोबत गेल्यामुळे चंदगडचे त्यांच्याविरुद्ध उभा असणारे उमेदवार शिवाजीराव पाटील यांची भूमिका आता कोणती राहील याकडे बघणे गमतीचे ठरेल. त्याचबरोबर अनेक भाजपचे दुसऱ्या फळीतील नेते जे सत्तेसाठी उत्सुक होते त्यांचीही आता विकेट गेली आहे.यामुळे केवळ राष्ट्रवादीत अस्वस्थता निर्माण झाली नाही तर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झालेली आहे.त्याचबरोबर राष्ट्रवादीतील दुसरी फळी उत्साहात आहे कारण वरचे नेते गेल्यामुळे त्यांना संधी मिळणार आहे.
त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्यावर मोठ्या प्रमाणात ईडी आणि इतर कारवायांची भ्रष्टाचाराची प्रकरण लागू होती ते नेते सत्तेत गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरील किटाळ निघून गेले अशा स्वरूपाचं काही लोकांमधून मत व्यक्त होत आहे.