Tuesday, January 14, 2025

/

एक पैसा ही नको….फक्त बळ्ळारी नाल्याची खोली वाढवा

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बळ्ळारी नाल्यामुळे दरवर्षी नुकसानीचा सामना करून आर्थिक संकटात सापडणाऱ्या बेळगाव शहर परिसर आणि खेडेगावांमधील शेतकऱ्यांनी सुखी व्हायचे असेल तर या नाल्याचा विकास होणे अत्यंत गरजेचे आहे. आम्हा शेतकऱ्यांना सरकारकडून नुकसान भरपाई दाखल एक पैसाही नको त्यांनी फक्त बळ्ळारी नाल्याची खोली वाढवावी एवढीच आमची मागणी आहे, असे रयत संघटनेचे बेळगाव तालुका अध्यक्ष राजू मरवे यांनी स्पष्ट केले.

गेल्या चार-पाच दिवसापासून होणाऱ्या दमदार पावसामुळे बळ्ळारी नाल्याचे पाणी दरवर्षी प्रमाणे यावेळीही आसपासच्या शेतजमिनीत घुसून सर्व पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. मरवे म्हणाले की, बळ्ळारी नाला हा गेल्या १० वर्षापासून बेळगाव शहर परिसर आणि आजूबाजूच्या खेड्यातील शेतकऱ्यांसाठी मोठे दुखणे झाला आहे.

या नाल्यामुळे येथील शेतकऱ्यांना इतका त्रास होत आहे की त्यांचे जगणे ही मुश्किल झाले आहे. पूर्वी 30-40 वर्षांपूर्वी बळ्ळारी नाला असा होता की कितीही मोठा पाऊस झाला तरी चार दिवसात पाण्याचा निचरा होत होता. कारण त्यावेळी नाल्याची रुंदी कमी असली तरी खोली जास्त होती. मात्र आता 2023 मध्ये या नाल्याची रुंदी वाढविण्यात आली, परंतु खोली मात्र तशीच ठेवण्यात आली. त्यामुळे आजूबाजूच्या गाळ जाण्याबरोबरच जलपर्णीने हा नाला भरला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बळ्ळारी नाल्याची खोली आसपासच्या शेत जमिनीपेक्षा वर आली असल्यामुळे बाहेरचे पाणी नाल्यात जात नाही.यासाठी आम्ही गेल्या 2023 पासून आजतागायत सरकारला आणि संबंधित लोकप्रतिनिधींना निवेदन देत आहोत. मात्र सरकारचे बळ्ळारी नाल्याच्या समस्येकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.

यापूर्वीच्या भाजप सरकारच्या काळात तत्कालीन जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी 800 कोटी रुपयांचा निधी बळ्ळारी नाल्याच्या विकासासाठी मंजूर करत असल्याचे सांगितले होते. मात्र त्या 800 कोटींच्या निधीपैकी 8 रुपये देखील खर्च झाले नाहीत. तेंव्हा आता शेतकऱ्यांनी निवडून आणलेल्या विद्यमान सरकारने तरी बळ्ळारी नाल्याची खोली वाढवून या भागातील शेतकऱ्यांना सुखी करावे. तेंव्हा आता शेतकऱ्यांनी अस्तित्वात आणलेल्या सध्याच्या विद्यमान सरकारने तरी या भागातील शेतकऱ्यांना सुखी करण्यासाठी बळ्ळारी नाल्याची खुदाई करावी.Bellari nala flood

कारण हा बळ्ळारी नाला येळ्ळूरपासून सुरू होतो जो हुदलीपर्यंत 28 कि.मी. अंतराचा असून पुढे तो घटप्रभा नदीला मिळतो. या नाल्याची खुदाई करण्याबरोबरच साफसफाई केली गेली पाहिजे. या भागातील शेतकऱ्यांना सुखी करण्यासाठी हे अत्यावश्यक आहे. शेतकरी हा देशाचा कणा आहे हा कणाच मोडला तर अन्नधान्य कोण निर्माण करेल. तेंव्हा सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन बळ्ळारी नाल्यासंदर्भात स्वतंत्र बैठक घेऊन संबंधित सर्व समस्या निकालात काढाव्यात आणि या भागातील शेतकऱ्यांना वाचवावे अशी माझी समस्त शेतकरी बांधवांतर्फे राज्यातील काँग्रेस सरकारला कळकळीची विनंती आहे.

बळ्ळारी नाल्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे 2019 मध्ये आणि त्यानंतर मागील वर्षापर्यंत सातत्याने अतिवृष्टीमुळे या भागातील शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड हानी होऊन त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा पिक पेरणीसाठी अनेक शेतकऱ्यांना घरातील दागदागिने गहाण ठेवून कर्ज काढावे लागले आहे. या भागातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी एकरी 15 ते 20 हजार रुपये आणि लावणी करण्यासाठी 40 ते 50 हजार रुपये खर्च येतो. बळ्ळारी नाल्याला पूर आल्यास हा सर्व खर्च पाण्यात जातो. तेंव्हा सरकारने आता तरी गांभीर्याने लक्ष देऊन बळारी नाल्याची साफसफाई करून विकास साधावा.Bellari nala

आम्ही बळ्ळारी नाल्याच्या आसपासचे शेतकरी सरकारकडे कधीच नुकसान भरपाईची मागणी करणार नाही. आमची एकच मागणी आहे. आम्हाला तुमचा एक पैसा ही नको फक्त बळ्ळारी नाल्याची खोली वाढवा. जर या पद्धतीने सरकारने आम्हाला बळ्ळारी नाल्याची खुदाई करून दिल्यास आम्ही त्यांचे कायम ऋणी राहू, असे राजू मरवे पुढे म्हणाले.

सध्या अनगोळ, शहापूर, वडगाव, जुने बेळगाव, माधवपुर, धामणे शिवार, हालगा शिवार, बेळगाव शिवार, यरमाळ शिवार या पद्धतीने सुळेभावी, सांबरा, कुडची हा भाग बळ्ळारी नाल्याच्या व्याप्तीत येतो. या पद्धतीने लाखो एकर शेतजमीन या नाल्याला पूर आल्यामुळे दरवर्षी पाण्याखाली जाते. यासाठी सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन बळ्ळारी नाल्याचा प्रश्न कायमचा निकालात काढण्याद्वारे या भागातील शेतकऱ्यांना सुखी करावे अशी आमची कळकळीची मागणी आहे, असे ते शेवटी म्हणाले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.