कौटुंबिक कलहातून अवघ्या 7 वर्षाच्या चिमुकल्या बालिकेसह मातेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना काल कित्तूर जवळील दिंडलकोप्प गावामध्ये उघडकीस आली.
आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नांव महादेवी नायकप्पा इंचल (वय 34, रा. दिंडलकोप्प) असे असून तिच्या मयत मुलीचे नांव चांदणी इंचल (वय 7 वर्षे) असे आहे. गोकाक येथील जवान नायकप्पा इंचल याच्याशी महादेवीचा विवाह झाला होता. दोघांचा संसार सुखाने सुरू असताना 7 वर्षांपूर्वी पतीचे अकाली निधन झाल्यामुळे महादेवी मुलीसह माहेरी राहण्यासाठी दिंडलकोप्प येथे आली होती.
मात्र कांही काळाने कुटुंबातील मतभेद लक्षात घेऊन महादेवी स्वतंत्र राहण्यासाठी प्रयत्न करत होती. मात्र घरातील लोक त्याला आक्षेप घेऊन विरोध दर्शवत होते.
अखेर कौटुंबिक कलह आणि सातत्याने कुटुंबाचा जाच सहन न झाल्याने टोकाची भूमिका घेऊन महादेवी हिने आपल्या मुलीसह स्वतःचे आयुष्य आत्महत्या करून संपवल्याचे उघड झाले आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच कित्तूर पोलिसांनी दिंडलकोप्प येथे घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.