बेळगाव तालुक्यातील मन्नूर आंबेवाडी ग्रामपंचायतच्या नूतन अध्यक्षपदी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवार लक्ष्मी लक्ष्मण येळगुकर यांची तर उपाध्यक्षपदी शंकर मारुती सुतार यांची निर्विवाद निवड झाली आहे. या पद्धतीने या ग्रामपंचायतीवर पुन्हा समितीचा भगवा फडकला आहे.
मन्नूर आंबेवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज बुधवारी दुपारी पार शांततेने सुरळीत पडली. या निवडणुकीत मावळते अध्यक्ष चेतन पाटील यांच्या नेतृत्वाखाली समिती उमेदवारांनी प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवारांवर निर्विवाद विजय मिळवला.
ग्रामपंचायत अध्यक्षपदासाठी म. ए. समितीच्या उमेदवार लक्ष्मी लक्ष्मण येळगुकर आणि काँग्रेसच्या सुचिता सांबरेकर यांच्यात थेट लढत होती.
निवडणुकीत येळगुकर यांना 13 मते पडली तर प्रतिस्पर्धी सांबरेकर यांना 11 मतांवर समाधान मानावे लागले. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत म. ए. समितीचे शंकर मारुती सुतार यांना 14 मते, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या राजश्री तोरे यांना 11 मते पडली. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच म. ए. समितीचे ग्रा. पं. सदस्य व मावळते अध्यक्ष चेतन पाटील यांनी नूतन अध्यक्ष लक्ष्मी येळगुकर व उपाध्यक्ष शंकर सुतार यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले. यावेळी विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करून आनंद व्यक्त केला.
गत विधानसभा निवडणुकीतील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले यांच्या नेतृत्वाखाली माजी अध्यक्ष चेतन पाटील आणि सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा समितीचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यात यश मिळवले आहे.