बेळगाव लाईव्ह :यंदाच्या श्री गणेशोत्सवाप्रसंगी सर्व सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांना सरकारकडून विजेच्या बिलात सवलत देण्यात यावी, अशी मागणी मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ आणि शहरातील सर्व सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांनी सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे केली आहे.
मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकारी व सदस्यांच्या शिष्टमंडळाने उपरोक्त मागणीचे निवेदन आज मंगळवारी जिल्हा पालकमंत्री जारकीहोळी यांना सादर केले. निवेदनाचा स्वीकार करून मंत्र्यांनी महामंडळाच्या मागणीचा निश्चितपणे विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. यंदाचा श्री गणेशोत्सव येत्या 19 सप्टेंबर 2023 रोजी साजरा केला जाणार आहे. संपूर्ण जगात मुंबईनंतर बेळगाव शहरात श्री गणेशोत्सव भव्य प्रमाणात साजरा केला जातो. आपली समृद्ध संस्कृती आणि भव्यता दर्शवणारा बेळगावचा गणेशोत्सव देशभरात प्रसिद्ध आहे. गेल्या कांही महिन्यात हेस्कॉमने केलेली भरमसाठ वीज दरवाढ सर्व गणेशोत्सव मंडळांसाठी आर्थिक बोजा वाढवणारी ठरणार आहे.
बेळगाव शहरातील गणेशोत्सव मंडळे त्यांना मिळणाऱ्या अल्प सार्वजनिक वर्गणीतून गणेशोत्सव साजरा करतात. या गोष्टींचा विचार करून सरकारने यंदाच्या श्री गणेशोत्सवाप्रसंगी सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना त्यांच्या वीज बिलामध्ये सवलत द्यावी अशी मागणी करण्यात आली.यावेळी बोलताना पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी आगामी
दोन-चार दिवसात गणेश उत्सवा संदर्भात अधिकाऱ्यांची लवकरच बैठक बोलावून सर्व समस्यांचे समाधान करण्याचे आश्वासन दिले
त्याचप्रमाणे श्री गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात आपण महामंडळ आणि संबंधित सरकारी खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी ही विनंती, अशा अशा तपशील जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना सादर केलेल्या निवेदना नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्यासह कार्यकारी अध्यक्ष रणजीत चव्हाण -पाटील, उपाध्यक्ष सागर पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी डॉल्बी , पेंडाल आणि मूर्तिकार असोसिशनचे सदस्य उपस्थित होते.