ग्रामीण शाळांमधील बाल संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या एज्युकेशन इंडिया या संस्थेतर्फे मिशन सपोर्ट अंतर्गत ‘लाईट स्टार ग्रुप’ या विद्यार्थ्यांच्या गटाने तयार केलेल्या लाईटचा अर्थात दिव्याचा प्रकाश टाकणाऱ्या पेनांच्या उत्पादनासाठी 20 लाख रुपयांची गुंतवणूक केली असून लाईट जोडलेली 10 हजार पेनं तयार करण्याची पहिली ऑर्डर देखील दिली आहे. पहिल्या टप्प्यात ही सर्व पेनं विद्यार्थ्यांना मोफत वाटली जाणार आहेत, अशी माहिती एज्युकेशन इंडियाचे संस्थापक आणि सीईओ डॉ. मनजीत जैन यांनी दिली.
शहरातील हॉटेल आदर्श पॅलेस येथे आज गुरुवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सदर पत्रकार परिषदेत देण्यात आलेल्या माहितीनुसार जीवनात विविध मार्गावरून वाटचाल करत असलेल्या नवउद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठातर्फे (व्हिटीयू) अलीकडेच गुंतवणूकदार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यात 25 नव उद्योजक आणि गुंतवणूकदारांनी भाग घेतला होता. त्यावेळी नवउद्योजकांनी सादर केलेले प्रस्ताव हे मोठ्या प्रस्थापित आणि अग्रेसर व्यवसायांसाठीचे होते. मात्र त्यामध्ये ‘लाईट स्टार ग्रुप’ या कित्तूर नजीकच्या कत्रीदड्डी येथे असलेल्या सरकारी शाळेतील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या गटाने तयार केलेल्या लाईटचा प्रकाश टाकणाऱ्या पेन उत्पादनाचा प्रस्ताव काहीसा वेगळा होता.
ग्रामीण तसेच शहरी भागात अचानक वीज पुरवठा खंडित झाल्यास अभ्यासासाठी बसलेल्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते. लाईट गेल्यास विशेष करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असते. हे लक्षात घेऊन अंधारातही लिखाण करता यावे यासाठी छोट्या सेलचा लाईट अर्थात दिवा जोडलेल्या पेनाची निर्मिती लाईट स्टार ग्रुपने केली आहे. व्हिटीयूमध्ये सादर करण्यात आलेल्या या पेनाच्या उत्पादनाच्या प्रस्तावासह त्याचे प्रात्यक्षिक पाहून एज्युकेशन इंडियाचे संस्थापक आणि सीईओ डॉ. मनजीत जैन अतिशय प्रभावी झाले. खरे तर लाईट स्टार ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी वीजपुरवठा खंडित झाल्यास आपल्या इतर सहअध्यायी विद्यार्थ्यांना आपल्या मित्रांना मदत व्हावी या हेतूने लाईट बसवलेल्या पेनाची निर्मिती केली होती. मात्र ही संकल्पना जैन यांना इतकी आवडली की त्यांनी या पेनांचे उत्पादनच करण्याची योजना आखली आहे.
यासाठी त्यांनी 20 लाख रुपयांची गुंतवणूक करण्याबरोबरच 10 हजार पेनांचा पुरवठा करण्याची ऑर्डर देखील नोंदविली आहे. पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार ही 10 हजार पेनं सर्व माध्यमांच्या विद्यार्थी -विद्यार्थिनींना जनजागृतीसाठी मोफत वाटली जाणार आहेत.
पत्रकार परिषदेत एज्युकेशन इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांच्या शंकांचे निरसन केले. त्याचप्रमाणे सीईओ जैन यांनी शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या पेनामध्ये आवश्यक बदल आणि सुधारणा केल्या जाणार असल्याचेही स्पष्ट केले. याप्रसंगी एज्युकेशन इंडियाचे अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.