मान्सूनच्या बाबतीत बेळगाव सध्या तीव्र मंदी अनुभवत आहे. केएसएनएमडीसीने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार गेल्या जून 2023 मध्ये बेळगाव मध्ये सरासरी 146 मि.मी. पेक्षा लक्षणीयरित्या कमी म्हणजे 68 टक्के तूट दर्शविणारा अवघा 47 मि.मी. पाऊस पडला आहे.
मान्सूनच्या बाबतीत बेळगाव सध्या तीव्र मंदी अनुभवत आहे. मान्सूनपूर्व पावसाने यंदा शहरात तुरळक हजेरी लावली, तर संपूर्ण जिल्ह्यात पाऊस जेमतेम पडला आहे. मान्सूनला सुरुवात होऊन आता जवळपास 10 दिवस झाले असले तरी अद्याप आपण कांही मोजक्याच वेळा कमी कालावधीसाठी मुसळधार पाऊस अनुभवला आणि ही अत्यंत निराशाजनक बाब आहे.
अधून मधून पडणारा रिमझिम पाऊस वगळता गेले दोन आठवडे शहर परिसरातील वातावरण ढगाळच होते. या कालावधीत भरीव असा पाऊस झालाच नाही. परिणामी पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली. ज्यामुळे सध्या बेळगाव शहराच्या कांही भागासह जिल्ह्यातील अनेक गावांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.
केएसएनएमडीसीने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार गेल्या जून 2023 मध्ये बेळगाव मध्ये सरासरी 146 मि.मी. पेक्षा लक्षणीयरित्या कमी म्हणजे 68 टक्के तूट दर्शविणारा अवघा 47 मि.मी. पाऊस पडला आहे. नैऋत्य मान्सूनची तुलना करता गेल्या 1 जून ते 3 जुलै 2023 दरम्यान तब्बल 62 टक्के तुट दर्शवणारा पाऊस पडला आहे.
कागवाड परिसरातील पावसात यंदा 89 टक्के तूट असून त्या तुलनेत बेळगाव तालुक्याची स्थिती किंचित चांगली असून येथे 84 टक्के कमी पाऊस पडला आहे. दुसरीकडे खानापूर तालुक्यातील पावसामध्ये 58 टक्के तूट आहे. पाणलोट क्षेत्रामध्ये अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे बहुतांश जलाशयातील पाणीसाठा मृत साठ्याच्या (डेड स्टोरेज) पातळीवर पोहोचला आहे. गेल्या जून महिन्यात बेळगाव जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये झालेली पावसाची नोंद अनुक्रमे तालुका, मिलिमीटर मध्ये सामान्य पाऊस, प्रत्यक्ष पडलेला पाऊस व टक्केवारीत पावसाची तूट यानुसार) खालील प्रमाणे आहे.
अथणी : सामान्य पाऊस 81 मि.मी., प्रत्यक्ष पडलेला पाऊस 24 मि.मी., पावसाची तूट -71 टक्के. बैलहोंगल : 147 मि.मी., 40 मि.मी., -73 टक्के. बेळगाव : 241 मि.मी., 39 मि.मी., -84 टक्के. चिक्कोडी : 99 मि.मी., 26 मि.मी., -74 टक्के. गोकाक : 77 मि.मी., 20 मि.मी., -74 टक्के. हुक्केरी : 91 मि.मी., 22 मि.मी., -76 टक्के. खानापूर : 381 मि.मी., 158 मि.मी., -58 टक्के. रामदुर्ग : 73 मि.मी., 35 मि.मी., -53 टक्के. रायबाग : 75 मि.मी., 35 मि.मी., -51 टक्के. सौंदत्ती : 91 मि.मी., 36 मि.मी., -60 टक्के. कित्तूर : 201 मि.मी., 47 मि.मी., -77 टक्के. निप्पाणी : 160 मि.मी., 33 मि.मी., -79 टक्के. कागवाड : 103 मि.मी., 12 मि.मी., -89 टक्के. मुडगली : 79 मि.मी., 31 मि.मी., -61 टक्के.