दोन दिवसांपूर्वी निर्घृण हत्या झालेल्या आचार्य श्री कामकुमार नंदी महाराजांवर आज हिरेकुडी येथे अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी हजारोंच्या संख्येने भक्त, नेतेमंडळी उपस्थित होते.
रविवारी दुपारी 1.30 च्या दरम्यान
चिकोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील नंदी पर्वत आश्रमाच्या परिसरात आचार्य श्री कामकुमार नंदी महाराजांच्यावर अंत्यसंस्कार विधी झाली. यावेळी त्यांचे पुतणे व आश्रमाचे अध्यक्ष बाबू भिमाप्पा उगारे यांनी अग्नी दिली. सर्व अंत्यसंस्कार व इतर विधी जैन धर्माच्या विधीनुसार पार पडले.
दोन दिवसांपूर्वी नराधमांनी क्रुरपणे हत्या केली होती. त्यानंतर काल पोलिसांनी आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार कूपनलिकेतून मृतदेहाचे तुकडे बाहेर काढले होते. आज सकाळी बेळगांव जिल्हा इस्पितळात उत्तरीय तपासणी झाल्यानंतर रुग्णवाहिकेतुन मृतदेह दुपारी हिरेकुडी येथील आश्रमावर दाखल झाले.
यानंतर हजारो भक्तांच्या उपस्थितीत विधिवत पूजा कार्य करून अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी नांदणीचे जीनसेन भट्टारक पट्टाचार्य स्वामीजी, कोल्हापूरचे श्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य स्वामीजी, वरूरचे धर्मसेन भटारक पट्टाचार्य स्वामीजी, आमदार गणेश हुक्केरी, माजी मंत्री व विधान परिषद सदस्य लक्षण सवदी , अरिहंत संघाचे प्रमुख उत्तम पाटील , भाजप जिल्हाध्यक्ष डॉ राजेश नेर्ली यांच्यासह मान्यवर व भक्त जैन समाज बांधव उपस्थित होते
घरची मंडळी उपस्थित : या अंत्यसंस्काराला मुनींचे मोठे भाऊ लक्ष्मण भिमाप्पा उगारे, पुतण्या बाबू भीमाप्पा उगारे, रामप्पा भिमाप्पा उगारे, सुनील रामप्पा उगारे यांच्यासह इतर घरची मंडळी उपस्थित होती.
आरोपी न्यायालयीन कोठडीत : या प्रकरनातील संशयित आरोपी नारायण माळी व हसन ढालायत यांना न्यायालयाने कोठडी सुनावली असून ते सद्या हिंडलगा कारागृहात आहेत. पोलिसांनी लवकरच आपल्या कस्टडीत घेऊन पुढील तपास हाती घेतला जाणार आहे.
ए डी जी पी यांनी दिली त्या जैन मुनींच्या आश्रमाला भेट
कामकुमार नंदी महाराजांच्या हत्येप्रकरणी आज रात्री उशीरा कायदा व सुव्यवस्था विभागाचे एडीजीपी आर.हितेंद्र यांनी हिरेकुडी गावाला भेट दिली. तर उद्या गृहमंत्री डॉ जी परमेश्वर चिकोडीला भेट देणार आहेत.
आज रात्री उशिरा एडिजीपी हितेंद्र यांनी हिरेकुडी येथे आश्रमाला भेट दिली. त्यानंतर कांही वेळ चिकोडीत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. रात्री ते बेळगाव येथे मुकाम करीत आहेत.
उद्या चिकोडी शहरात भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर उद्या चिकोडीच्या दौऱ्यावर असलेले गृहमंत्री परमेश्वर हे मोर्चाच्या वेळी उपस्थित राहणार आहेत. तसेच एडीजीपी व अधिकाऱ्यांसोबत हिरेकुडी गावाला भेट देण्याची शक्यता आहे.