कॅसलरॉक पुढे घाटातील रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने दिल्ली ते वास्को ही निजामुद्दीन एक्सप्रेस रेल्वे काल मध्यरात्री बेळगाव रेल्वे स्थानकावरच थांबवण्यात आली. रेल्वे अचानक रद्द झाल्याने मोठी गैरसोय झालेल्या गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांच्या मदतीला धावून जात बेळगाव रेल्वे स्थानकाच्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांची रेल्वेच्यावतीने गोव्याला जाण्याची व्यवस्था करून दिली.
दरम्यान कोसळलेल्या दरडीमुळे बेळगाव -गोवा मार्गावरील आज संध्याकाळपर्यंतच्या सर्व रेल्वे सेवा रद्द होण्याची शक्यता असून बेळगाव मार्गे असलेली वास्को -निजामुद्दीन एक्सप्रेस कोकण मार्गाने वळवली जाऊ शकते.
मागील आठवड्याभरापासून कोकणासह पश्चिम घाटात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे घाटमाथ्यावर दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. आता पंधरा दिवसात काल दुपारी चारच्या सुमारास दुसऱ्यांदा कॅसलरॉक ते करंझोळी या दोन रेल्वे स्थानकादरम्यान दरड कोसळली. करंझोळी जवळील तिसऱ्या क्रमांकाच्या बोगद्याजवळ झाडे व मातीचा मोठा भराव असलेली ही दरड रेल्वे रुळावर कोसळल्यामुळे रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
नैऋत्य रेल्वेच्या इंजीनियरिंग विभागाकडून दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असले तरी धुवाधार पावसामुळे कामामध्ये व्यत्यय येत होता. दरड हटविण्याचे काम सुरूच असल्यामुळे दिल्लीहून वास्कोला जाणारी निजामुद्दीन एक्सप्रेस काल रात्री 1:30 वाजता बेळगाव रेल्वे स्थानकावरच थांबवण्यात आली.
पावसाळ्यात या पद्धतीने रेल्वे अचानक रद्द झाल्यामुळे गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होऊन त्यांच्या तीव्र नाराजी व्यक्त होत होती. तथापि रेल्वे अधिकारी त्यांच्या मदतीला धावून गेले. त्यांनी गोव्याला जाणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी रेल्वेच्यावतीने बसची सोय करून दिली. बाहेर संततधार पाऊस पडत असताना बेळगाव रेल्वे स्थानकाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या या मदतीबद्दल प्रवाशात समाधान व्यक्त होत होते. मिळालेल्या माहितीनुसार कोसळलेली दरड प्रचंड मोठी असल्यामुळे ती हटविण्याचे काम आजही सुरूच होते.
पावसाच्या व्यत्ययामुळे रुळावरील दगड मातीचा ढीग हटविण्यासाठी रेल्वे इंजीनियरिंग विभागाच्या कर्मचाऱ्यांना परिश्रम घ्यावे लागत आहेत. त्यामुळे आजही बेळगाव मार्गे गोव्याकडे जाणाऱ्या रेल्वे रद्द होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे गोव्याहून बेळगाव मार्गे जाणारी वास्को -निजामुद्दीन एक्सप्रेस देखील कोकण रेल्वे मार्गाने वळविली जाण्याची शक्यता आहे.
तसे झाल्यास आज बेळगावहून दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. दरम्यान दरड कोसळल्यामुळे काल मंगळवारी देखील वास्को -निजामुद्दीन एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गाने वळविण्यात आली होती. परिणामी बेळगावहून पुणे, भोपाळ, दिल्ली येथे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली होती. रेल्वे स्थानकावर ताटकळत बसलेल्या प्रवाशांना नाराजी व्यक्त करत अखेर घरी परतावे लागले होते.