गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खानापुरातील नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून मणतुर्गाजवळील पुलावर आज दुसऱ्या दिवशीही पाणी आल्यामुळे शिरोली भागातील अनेक गावांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला आहे. या खेरीज अनेक ठिकाणी नदी -नाल्यांना पूर आल्यामुळे तालुक्यातील सुमारे 30 ते 40 गावांना बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
पश्चिम घाटात मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे गेल्या मंगळवारपासून खानापूर तालुक्यातील नदी नाल्यांच्या पाणी पातळी कमालीची वाढ झाली आहे. ही पाणी पातळी मिनिटागणिक वाढत असल्याने अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत.
परिणामी तालुक्यातील सुमारे 30 हून अधिक गावांचा शहर आणि आसपासच्या परिसराशी संपर्क तुटला आहे. पाण्याखाली गेलेल्या पुलांच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तासह वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान तालुका प्रशासनाने सतर्कता बाळगण्याचा इशारा जनतेला दिला आहे.
सध्या खानापूर तालुक्यात दमदार पर्जन्यवृष्टी होत असून संततधार पावसामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये झाडाच्या फांद्या तुटून पडण्याच्या आणि झाडे उन्मळून पडण्याच्या घटनांमुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे याखेरीस अनेक गावातील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे लोकांना अंधारात चाचपडावे लागत आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागासह खानापूर शहर देखील दोन दिवसापासून गारठले आहे. संततधार पावसामुळे बाजारपेठेतील दैनंदिन व्यवहारावर परिणाम झाला आहे. ग्रामीण भागात भात लागवडीची लगबग सुरू झाल्यामुळे शहरातील नेहमीची गर्दी घटली आहे.
दरम्यान, हब्बनहट्टी येथील स्वयंभू मारुती देवस्थानाच्या ठिकाणी मलाप्रभा नदीमध्ये आंदोलन करीत असलेल्या देवेंद्र शर्मा या साधूने अखेर तेथून माघार घेतली आहे. हंडीभडंगनाथ येथील सिद्धेश्वर मठाच्या मठादिशांच्या आदेशावरून त्याने आपले आगळे आंदोलन मागे घेतले. साधू देवेंद्र शर्मा यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना दोरीच्या सहाय्याने नदीतून बाहेर काढले.