शहरातील विजया ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटरचे प्रमुख डॉ. रवी बी. पाटील यांनी माजी सैनिक संघटना रामतीर्थनगर बेळगाव यांच्या सहकार्याने आयोजित केलेला 24 वा ‘कारगिल विजय दिवस’ सोहळा आज मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.
रामतीर्थनगर येथील हर्षा हॉटेलनजीक असलेल्या राजमहल सभागृहामध्ये विजया ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटरचे प्रमुख डॉ. रवी बी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून तोराळी डीआयजीपी रवींद्रन एम. एल. हे प्रमुख पाहुणे म्हणून तर माळ मारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिद्धगौडा मोदगी आणि नगरसेवक हनुमंत कोंगाली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी या सर्व मान्यवरांच्या हस्ते जय हिंदच्या जयघोषात कारगिल युद्धातील शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. या सोहळ्यामध्ये कारगिल युद्धात भाग घेतलेल्या जवानांचा आणि या युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या वीर पत्नींचा तसेच नेमबाजीत राष्ट्रीय स्तरावर तीन वेळा विजेतेपद मिळवलेल्या एनसीसी छात्र प्रीती सवदी यांचा मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावरील मान्यवरांच्या समायोचीत भाषणानंतर डॉ. रवी पाटील यांनी आजच्या कारगिल विजय दिनानिमित्त आपल्या हॉस्पिटलतर्फे सध्या सेवेत असलेले सैनिक, माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या उपचारासाठी उपलब्ध केलेल्या ‘हेल्थकार्ड’चे अनावरण केले. सदर हेल्थ कार्डद्वारे सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांवर प्राधान्याने सवलतीच्या दरात उपचार केले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रारंभी बसवराज बन्नूर यांनी सर्वांचे स्वागत केले. सोहळ्यास माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र हलगी, मल्लेश वन्नुर, कामगार खात्याचे अधिकारी गडनवर, चंद्रशेखर सवदी आदींसह निमंत्रित मंडळी, आजी-माजी सैनिक त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर सोहळ्यातील सत्कारमूर्ती कारगिल युद्धात सहभागी झालेले आणि अंगावर गोळ्या झेलणारे 9 मराठा रेजिमेंटचे सेवानिवृत्त जवान कॅम्प, बेळगाव येथील प्रकाश पाटील हे प्रसिद्धी माध्यमांना 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धाच्या आपल्या आठवणी सांगताना म्हणाले की, त्यावेळी कांही नैसर्गिक कारणास्तव आपली जागा सोडून भारतीय फौजेला थोडे मागे यावे लागले होते. त्याचा फायदा उठवत पाकिस्तानी फौजेने ती जागा बळकावली. तसेच त्यांनी त्या ठिकाणी बंकर बांधून शस्त्रे जमा करत युद्धाची तयारी चालवणल्याची माहिती भारतीय फौजेला मिळाली. तेंव्हा पाकिस्तानच्या ताब्यात असलेली ‘आपल्या देशाची इंच न इंच जमीन परत मिळवा’ असा आदेश तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी दिला. तो आदेश मिळताच भारतीय फौजेने जोरदार चढाई करून अथक परिश्रमाअंती पाक फौजेला पराभूत करत 26 जुलै 1999 रोजी कारगिल मधील ती जागा पुन्हा आपल्या ताब्यात घेतली.
कारगिल युद्धप्रसंगी झालेल्या फायरिंग अर्थात गोळीबाराप्रसंगी मला 30 गोळ्या लागल्या होत्या. माझा उजवा हात त्यामुळे निकामा होऊन कापावा लागला असून एक गोळी छातीतून आरपार पाठीतून बाहेर पडली होती. माझ्या पोटाची यातली बाहेर पडली होती ती पुन्हा पोटात सारली होती. मोठ्या प्रमाणात गोळ्या लागूनही मी खचलो नाही आपण कोणत्याही परिस्थितीत जिवंत राहिले पाहिजे असा निर्धार मी केला होता असे सांगून हॉस्पिटलमधील डॉक्टर त्यावेळी देवासारखे माझ्या मदतीला धावून आले. त्यांनी अहोरात्र माझ्या उत्तम उपचार केले. देवाचा आशीर्वाद आणि डॉक्टरांनी घेतलेले परिश्रम यामुळेच मी आज पुन्हा सर्वसामान्य माणसाप्रमाणे जीवन जगत आहे, प्रकाश पाटील यांनी शेवटी सांगितले.