चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी येथील नंदीपर्वत आश्रमाचे जैन मुनी १०८ कामकुमार नंदी महाराज यांच्या हत्येचा निषेधार्थ बेळगावात रविवारी जैन समाजबांधवांनी जोरदार आंदोलन केले. सुवर्ण विधानसौध समोर पुणे -बंगळुरू ४ राष्ट्रीय महामार्गावर रोको दीड तास हून अधिक काळ रस्ता रोको आंदोलन करून जैन मुनी, स्वामीजींना संरक्षण देण्याची मागणी केली.
हलगा गावचे सिद्धसेन महाराज यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात आबालवृद्धांसह जैन समाजाचे नेते आणि हजारो लोक सहभागी झाले होते. जैन धर्माचे ध्वज हाती घेऊन आंदोलकानी जोरदार घोषणाबाजी करत जैन मुनींच्या निर्घृण हत्येचा तीव्र निषेध केला. अहिंसा परमोधर्म की जय, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत आंदोलक संतप्त झाले.
यावेळी निदर्शकांना संबोधित करताना श्वेतांबर जैन समाजाचे नेते राजेंद्र जैन यांनी मुनींच्या हत्येचा निषेध केला. शॉक देऊन मुनींचा जीव गेल्यानंतरही त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून नादुरुस्त कूपनलिकेत फेकून देणे यासारखी एखाद्या स्वामींची निर्घृण हत्या या देशातच काय संपूर्ण जगात झाली नसावी. या क्रूर कृत्यांत गुंतलेल्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी माजी आमदार संजय पाटील म्हणाले की, सर्वसंग परित्याग केलेले स्वामीजी पैशांच्या व्यवहारात गुंतलेले होते असे सांगून पोलिसांनी जैन स्वामींचा व समाजाचा अवमान केला आहे. या प्रकरणाचा योग्य तपास करून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. जेणेकरून केवळ जाईनच नव्हे तर अन्य समाजाच्या स्वामीजी आणि मुनींमध्ये, समाज, सरकार, कायदा व सुव्यवस्था तुमच्यासोबत आहे, तुमच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, हा संदेश गेला पाहिजे.
यावेळी पोलिसांनी सरकारच्या दबावाखाली येऊ नये, तपास पूर्ण झाल्याशिवाय स्वामीजी किंवा एखाद्या धर्माची बदनामी होईल अशी विधाने करू नयेत, नि:पक्षपणे तपास करून जो कोणी दोषी आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे अशी मागणी करण्यात आली.
त्यानंतर उपस्थित जैन समाजबांधवांना संबोधित करताना सिद्धसेन महाराजांनी सरकारने सर्व समाजाच्या साधू-मुनींना संरक्षण देण्याची मागणी केली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी राठोड यांना जैन समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
या निदर्शन-आंदोलनात सिद्धसेन महाराजांच्या नेतृत्वाखाली राजेंद्र जैन, अभय अवलक्की, यांच्यासह श्वेतांबर व दिगंबर जैन समाजाच्या हजारो नागरिकांनी भाग घेतला. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली. आंदोलनस्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.