बेळगाव लाईव्ह : चिकोडी तालुक्यातील हिरेकोडी येथील आचार्य श्री कामकुमार नंदी महाराजांच्या खून प्रकरणातील आरोपींना आज चिकोडी न्यायालयाने २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे दोन्ही आरोपींना आज हिंडलगा कारागृहात हलविण्यात आले.
जैन मुनींच्या खून प्रकरणाचे आरोपी नारायण माळी व हसन ढालायत हे मागील सात दिवसापासून पोलिस कस्टडीमध्ये होते. आज पोलीस कस्टडीची मुदत संपल्याने चिकोडी पोलिसांनी सोमवारी सायंकाळी ४ च्या दरम्यान चिकोडी शहरातील वरिष्ठ दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश चिदानंद बडीगेर यांच्यासमोर हजर करण्यात आले.
दोन्ही आरोपींना २१ जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडीचा आदेश न्यायाधीश बडीगेर यांनी दिला आहे. यामुळे दोन्ही आरोपीना कडक बंदोबस्तात हिंडलगा कारागृहात हलविण्यात आले.
यावेळी चिकोडी न्यायालय परिसरात मोठी लोकांनी मोठी गर्दी केल्याने चिकोडी डीवायएसपी बसवराज यलिगार, सीपीआय आर आर पाटील यांच्या नेतृत्वाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.