बेळगाव लाईव्ह : हिरेकुडी येथील आश्रमातून अचानक जैन मुनी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. हिरेकुडी येथील डोंगरावरील नंदी पर्वत नावाच्या जैन आश्रमातून आचार्य श्री 108 कामकुमार नंदी महाराज नामक मुनी बेपत्ता झाले आहेत.
५ जुलै पासून हे मुनी बेपत्ता असून ते कुठे गेले आहेत याची कल्पनाही कुणाला देण्यात आलेली नाही. रात्री १० पर्यंत आपल्या खोलीतच वावरताना भक्तांनी त्यांना पहिले होते. मात्र सकाळी आश्रमात गेल्यानंतर ते नसल्याचे उघडकीस आले.
मागील 15 वर्षापासून या आश्रमात हे मुनी राहत आहेत. विशेष म्हणजे बाहेर जात असताना स्वतः जवळील कवच, कमंडल व मोबाइल घेऊन जात होते. पण हे सर्व साहित्य ते राहत असलेल्या खोलीतच आढळून आल्याने याप्रकरणी गोंधळ वाढला आहे. अचानक बेपत्ता झालेल्या मुनींमुळे श्रावकात भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सर्व भक्त आणि आश्रम ट्रस्टचे पदाधिकारी आसपास परिसरात शोधकार्य करत आहेत. मात्र अचानकपणे बेपत्ता झालेल्या मुनी महाराजांचा घातपात झाला आहे का? अशी शक्यताही वर्तविली जात आहे.
याप्रकरणी आचार्य कामकुमार नंदी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भीमप्पा उगारे यांनी चिकोडी पोलिसांत बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली असून आज चिकोडी डीवायएसपी बसवराज यलिगार व पीएसआय बसणगौडा नेर्ली यांनी आश्रमाला भेट देऊन पाहणी केली.