महापौर, उपमहापौर निवडणूक झाल्यानंतर आणि लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात आल्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी स्थायी समितीसाठी निवडणूक झाली. यामध्ये सत्ताधारी भाजप आणि विरोधी गटाच्या संगनमतामुळे भाजपचे वर्चस्व राहिले. या निवडणुकीत भाजपाने मनपापसंदर्भात असलेली आक्रमकता दाखवत विरोधी गटाला डावलून स्वतःचेच म्हणणे खरे करत पाच स्वतःकडे तर विरोधी पक्षाला दोन सदस्य असे समीकरण ठेवून स्थायी समितीचे अधिकार आपल्याकडे राखून ठेवले.
गेल्या कित्येक वर्षात महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक या स्थायी समितीवर बहुमताने वर्चस्व प्रस्थापित करत होते. मात्र सध्या अस्तित्वात आलेल्या मनपा सभागृहात केवळ 3 समितीचे नगरसेवक आहेत. त्यामुळे त्यांची सत्ताधारी भाजप आणि विरोधी गटानेही फारशी दखल घेतली नाही. त्यामुळे दोन्ही गटांनी समितीला केवळ मुद्दे मांडण्यापुरते मर्यादित ठेवले आहे. मनपात विरोधी गटाने स्थायी समितीचे अधिकार आपल्याकडेच राखून ठेवल्याने समिती नगरसेवकांना स्थायी समिती निवडणुकीत भोपळा मिळाला आहे. पुढील वर्षी संधी देण्याचे आश्वासन देऊन विरोधी गटाने समितीच्या नगरसेवकांना एकही स्थायी समितीत संधी दिली नाही.
गेल्या कित्येक वर्षांचा समितीचा पायंडा यंदाच्या स्थायी समिती निवडणुकीत भाजपने मोडीत काढला. विरोधी पक्षाला नमवून पाच सदस्य आपल्याकडे ठेवून ’हम करे सो कायदा’ हे धोरण अवलंबले. यावरून मनपासंदर्भात भाजप किती गांभीर्याने राजकारण करत आहे हे स्पष्ट होते.
या स्थायी समिती निवडणुकीत भाजपचे चिकोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपकडून हि एकप्रकारची खबरदारी घेतली गेल्याची चर्चाही सुरु होती.विरोधी गटाने चारही स्थायी समितीत दोन दोन सदस्य मिळालेल्या संख्येत महिलांना अधिक प्राधान्य देण्यात आले आहे.
स्थायी समिती निवडणुकीत भाजपने आपलेच म्हणणे खरे करत दोन अपक्ष नगरसेवकांपैकी 1 नगरसेवकाला संधी दिली. विधानसभा निवडणुकीत पराभव झेललेल्या भाजपने मनपा मात्र अत्यंत गांभीर्याने घेत स्थायी समितीच्या निवडणुकीत थेट दोन खासदारांनी उपस्थिती लावली तर राज्यात सत्तेत आलेल्या जिल्ह्यातील काँग्रेसच्या मंत्र्यांनी या निवडणुकीकडे पाठ फिरवली केवळ उत्तर आमदार राजू सेठ यांनी सकाळी हजेरी लावली होती.
एकूणच स्थायी समिती निवडणुकीत भाजप आक्रमक होती बेळगाव मनपाच्या इतिहासात नवीन पक्षीय राजकारणाची आगेकूच पाहायला मिळाली. स्थायी समितीत भाजपने बाजी मारली असली तरी पुढील कारभार चालवताना मात्र काँग्रेसही तडजोड करावी लागणार आहे. त्यामुळे सत्ताधार्यांची पुढील वाटचाल कशी असेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.