बेळगाव लाईव्ह : गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत असणाऱ्या इंदिरा कँटीनला राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यापासून अच्छे दिन आले आहेत! कष्टकरी, गरिबांना दिलासा देणाऱ्या या कॅंटीनमध्ये गेल्या दीड- दोन महिन्यापासून लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद दिसून येत असून आता या कॅंटीनमध्ये भाजी – भाकरी देखील उपलब्ध होणार आहे.
इंदिरा कॅंटीनमध्ये दैनंदिन लाभ घेणाऱ्यांची संख्यादेखील वाढू लागली असल्याने इंदिरा कँटीनच्या आवारात वर्दळ वाढलेली दिसत आहे. गोरगरीब जनतेला नाष्टा आणि जेवणाची सोय व्हावी, यासाठी शहराच्या विविध ठिकाणी इंदिरा कँटीनची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, अनुदान आणि इतर कारणांमुळे मध्यंतरी या कँटीनना उतरती कळा लागली होती. मात्र आता पुन्हा इंदिरा कँटीनला चांगले दिवस येऊ लागले आहेत.
शहरातील बसस्थानक मार्ग, एपीएमसी आवार, आझमनगर, जिल्हा रुग्णालय, क्लब रोड, गोवावेस सर्कल, नाथ पै सर्कल, कणबर्गी रोड आदी ठिकाणी इंदिरा कँटीन आहेत. यापैकी क्लब रोडवरील जिल्हा रुग्णालय व बसस्थानक मार्गावरील कँटीनमध्ये नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. नागरिकांना केवळ पाच रुपयात नाष्टा आणि दहा रुपयात जेवण उपलब्ध करून दिले जात असल्याने गोरगरीब हमाल, कष्टकऱ्यांना सोयीस्कर होऊ लागले आहे. शिवाय नाष्टा व भोजनाचा प्रश्नदेखील मार्गी लागला आहे.
शहरात कष्टकरी कामगारांची संख्या अधिक आहे. मात्र, नाष्टा व जेवणाअभावी अशा नागरिकांचे हाल होतात. अशा परिस्थितीत इंदिरा कँटीन आधार ठरू लागली आहेत. मध्यंतरी इंदिरा कँटीन ओस पडत होती.
मात्र, आता काँग्रेस सत्तेवर आल्यापासून कँटीनचे पुनरुज्जीवन होऊ लागले आहे. शिवाय नाष्टा आणि जेवणाबरोबर भाजी-भाकरी देण्याची योजना आखली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसापासून पाठ फिरविलेल्या इंदिरा कँटीनकडे लाभार्थ्यांनी आता पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.