चव्हाट गल्ली येथील एका ऑनलाईन सेंटरमध्ये ग्रामीण भागातील ग्राम-वन लॉगइन करून गृहलक्ष्मी योजनेच्या नांव नोंदणीसाठी तब्बल 250 रु. आकारून जनतेची लूट केली जात असल्याची तक्रार आहे.
राज्य सरकारच्या गृहलक्ष्मी योजनेसाठी नियमानुसार ग्रामीण भागातील लोकांकरिता ग्राम -वन सेवा केंद्रात तर शहरी भागातील लोकांसाठी बेळगाव -वन सेवा केंद्रात नांव नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
या नांव नोंदणीसाठी लाभार्थींकडून माफक 20 रुपये शुल्क आकारण्याची सूचना आहे. तथापि चव्हाट गल्ली येथील एका ऑनलाइन सेंटरमध्ये नागरिकांना लुबाडण्याचा प्रकार सुरू आहे.
सदर ऑनलाईन सेंटरमध्ये ग्रामीण भागातील ग्राम-वन लॉगइन करून गृहलक्ष्मी योजनांच्या नांव नोंदणीसाठी लाभार्थींकडे तब्बल 250 रुपयांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. नांव नोंदणीसाठी 20 रुपये शुल्क असताना 250 रु. कसे घेता असा जाब विचारल्यास ‘बेळगाव -वन सेवा केंद्रात 20 रुपये आकारले जातात, आमच्याकडे आम्ही अडीचशे रुपये घेतो’ असे उत्तर त्या ऑनलाइन सेंटर मधील कर्मचाऱ्यांकडून मिळत आहे.
शहरात ग्राम -वन सेवा केंद्र चालविण्याची परवानगी नसताना चव्हाट गल्लीमध्ये ते खुलेआम चालवून लोकांकडून पैसे उकळले जात असल्यामुळे नागरिकात सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. तरी लोकप्रतिनिधींसह संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सरकारी योजनेच्या नावाखाली नागरिकांना लुबाडण्याचा हा प्रकार तात्काळ थांबवावा.
त्याचप्रमाणे संबंधित ऑनलाइन सेंटर चालकावर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.