गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या पाण्याची पाईपलाईन घालण्याच्या कामामुळे न्यू गुडशेड रोड रस्त्याच्या एका बाजूची दुर्दशा झाली असून हा रस्ता त्वरित दुरुस्त करून पूर्ववत चांगला करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲलन विजय मोरे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी केली आहे.
शहराची पाणीपुरवठा व्यवस्था सांभाळणाऱ्या एल अँड टी कंपनीकडून न्यू गुडशेड रोड येथे पाईपलाईन घालण्याचे काम सुरू आहे. गेल्या महिन्याभरापासून हे काम सुरू असले तरी यामुळे या रस्त्याची दुर्दशा झाली आहे.
खोदकामामुळे सध्याच्या पावसात रस्त्यावर एका बाजूला चिखलाचे साम्राज्य आणि गढूळ पाण्याची डबकी निर्माण झाल्यामुळे स्थानिक रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या खेरीज खोदकाम करून पाईपलाईन घातल्यानंतर चर व्यवस्थित बुजवण्यात आलेली नाही. त्यामुळे ट्रक सारखी अवजड वाहने या ठिकाणी रस्त्यातच रुतून पडत आहेत. त्याचप्रमाणे चिखल आणि खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनाही घडत आहेत. आज या रस्त्यावर एक ट्रक अडकून पडल्याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते ॲलन विजय मोरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत आज मंगळवारी सकाळी न्यू गुडशेड रोडला भेट देऊन तेथील रस्त्याच्या समस्येबद्दल जोरदार आवाज उठवला.
एल अँड टी कंपनीकडून पाईपलाईन घातल्यानंतर चर व्यवस्थित न बुजवल्याने सध्या एक ट्रक या ठिकाणी रुतून पडला आहे. महिनाभर झाला या रस्त्याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्यामुळे रस्त्याच्या एका बाजूची दुर्दशा झाली आहे. फक्त माती टाकून खोदलेली चर बुजवण्यात आल्यामुळे सध्याच्या पावसात जमीन खचून ही चर अवजड तसेच इतर वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत आहे असे सांगून लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर रस्ता तातडीने पूर्ववत चांगला करावा, अशी मागणी मोरे यांनी यावेळी केली.
एका वयस्कर स्थानिक रहिवाशांने देखील पाईपलाईन घालण्याच्या कामामुळे रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेबद्दल माहिती देऊन आज या रस्त्यावर ट्रक सारखे अवजड वाहन रूतून अडकून पडण्याची ही पाचवी वेळ असल्याचे सांगितले.
तसेच महापालिका आणि एल अँड टीच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त करून या रस्त्यावर एखादा गंभीर अपघात झाल्यानंतरच रस्त्याची व्यवस्थित दुरुस्ती होणार का? असा सवालही त्यांनी केला. याप्रसंगी ॲलन मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह स्थानिक नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.