बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील बेनकनहळ्ळी, केंबाळी नाला परिसरात सुरु असलेल्या तीन दिवसाच्या धुव्वाधार पावसामुळे केंबाळी परिसरातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.
बेळगाव तालुक्यातील बेनकनहळ्ळी परिसरात तीन ते चार दिवसापासून उसंत दिलेल्या पावसाने गुरुवारी अचानक दोन वाजण्याच्या सुमारास रौद्ररूप धारण करीत दिवसभर धुव्वाधार हजेरी लावल्याने नदी, नाले, ओढे दुथडी भरुन वाहु लागले आहेत.
तर शेत परिसरातील पाझर तलावात ८० टक्के पाणी आले आहे. अनेकांच्या शेतातील शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली आल्याने शेताला देखील तलावाचे स्वरुप प्राप्त झाले.
शुक्रवारी दुपारी पावसाने काहीशी उसंत घेतल्याने शेतकऱ्यांनी मशागतीची कामे हाती घेतली होती.मात्र अचानक दुपारनंतर आभाळ भरून आले आणि धुव्वाधार पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली.
या पावसामुळे नदी-नाले, ओढे ओसंडून वाहु लागल्याने अनेक ठिकाणी नदीतील पाणी थेट शेतात देखील शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान दिवसभर चाललेल्या पावसाने शेकडो हेक्टरवरील भात सह अन्य पिके पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे.
शुक्रवारी दिवसभर पावसाने बॅटिंग केलेल्या पावसाची शनिवारी पहाटेपर्यंत रिपरिप सुरूच होती. शनिवारी सकाळीदेखील पावसाचा जोर असल्याने केंबाळी परिसरातील शेती पाण्याखाली आली आहे. या परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जरी मिटला असला तरी जोरदार पावसाने शेती कामाचा खोळंबा झाला आहे.
पावसाच्या जोरामुळे शेतकरी व मजुरांना घरचा रस्ता धरावा लागला. या भागात पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने शेती चे काम थोड्या वेळासाठी बंद ठेवण्यात आल्याचे पाहायला मिळाले.